भक्ती वाघिणीचा पाय पडून तिच्या एका बछड्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना दुसऱ्या बछड्यानेही जगाचा निरोप घेतला. आईची माया न मिळाल्याने दुसऱ्याही बछड्याचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. गेल्या आठवड्यात जन्मलेल्या दोन बछड्यांपैकी एकाचा अवघ्या चार दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. औरंगाबाद येथील सिद्धार्थ उद्यान प्राणीसंग्रहालयात ही घटना घडली.
सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयातील पिवळ्या भक्ती वाघिणीने दोन पांढऱ्या बछड्यांना जन्म दिला होता. भक्ती वाघिणीने बछड्यांना जन्म देण्याची ही पहिलीच वेळ होती. मात्र तिच्यामध्ये मातृत्वाची भावना दिसून आली नसल्याने ती पिल्लांची व्यवस्थित काळजी घेत नव्हती. वाघीण स्वतः बछड्यांना दूध पाजत नव्हती. त्यामुळे पिल्लाला ठराविक अंतराने बकरीचे दूध पाजण्यात येत होते. आईची माया न मिळाल्याने दुसऱ्याही बछड्याने अखेरचा श्वास घेतल्याची माहिती आहे.
भक्ती वाघिणीचा पाय नकळत स्वतःच्या पिल्लावर पडल्याने पहिल्या बछड्याचा 10 एप्रिलला मृत्यू झाला होता. बछड्याच्या शरीरात अंतर्गत रक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. एकाच दिवशी जन्मलेल्या दोन्ही बछड्यांनी एकामागून एक जगाचा निरोप घेतला. भक्ती वाघिणीने तीन एप्रिलला दोन पांढऱ्या रंगाच्या बछड्यांना जन्म दिला होता. पांढऱ्या रंगाचा वीर वाघ आणि पिवळ्या रंगाच्या भक्ती वाघिणींचे हे दोन बछडे. या दोन बछड्यांमुळे सिद्धार्थमधील पांढऱ्या वाघांची संख्या पाच झाली होती. एवढे पांढरे वाघ असणारे सिद्धार्थ उद्यान राज्यातील एकमेव प्राणिसंग्रहालय मानले जात. सिद्धार्थ उद्यानात समृद्धी वाघिणीने 25 डिसेंबर रोजी पाच वाघिणींना जन्म दिला होता. त्यानंतर सव्वा तीन महिन्यांनी पुन्हा नव्या पाहुण्यांच्या आगमनाने आनंदाचे वातावरण होते. मात्र अवघ्या काही दिवसांतच या आनंदावर विरजण पडले. आतापर्यंत 42 वाघांना जन्मस्थान असलेले सिद्धार्थ उद्यान हे व्याघ्रजननाचे नवे केंद्र ठरतेय. सिद्धार्थमधील एकूण वाघांची संख्या दोन नव्या बछड्यांच्या जन्माने 16 झाली होती, मात्र दुर्दैवाने ती घटून पुन्हा 14 वर आली आहे. त्यात वीर, अर्पितासह तीन पांढरे तर 11 पिवळ्या रंगाचे वाघ-वाघीण आहेत. या सर्व वाघांचे पालकत्व एसबीआय बँकेने घेतलेले आहे.