रत्नागिरी, सिंधुदुर्गासह मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील जिल्ह्यांना पावसाने अक्षरश: झोडपले आहे. मुसळधार पावसामुळे नदी, नाले ओसंडून वाहू लागले असून अनेक ठिकाणी रस्ते, घरे, दुकानांत पाणी शिरल्याचं पहायला मिळत आहे. तर कुठे मुसळधार पावसामुळे गावांचा संपर्क तुटला आहे. त्यातच आता हवामान विभागाने राज्यातील 11 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. तर एका जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जाहीर केला आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यात पावसाचा जोर आणखी दोन दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे. आज ज्या 11 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे त्यामध्ये मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे. तर पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर जळगाव, औरंगाबाद, बुलडाणा, जालना आणि अकोला जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
गुहागरमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस
गेल्या दोन दिवसांपासून कोकणात जोरदार पाऊस बरसत असून रात्री अतिमुसळधार पाऊस झाला. ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार उडाला असून नागरिकांच्या घरात, वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. पालशेतमध्ये नदीचे पाणी शिरल्याने संपूर्ण बाजारपेठेत पाणीच पाणी पहायला मिळत आहे. रात्रभर पडलेल्या पावसामुळे अंतर्गत गावांचा संपर्क तुटला. सकाळपासून पावसाने उसंत घेतल्यामुळे गुहागरवासियांना काहीसा दिलासा मिळाला आहे. अनेक भागात पडझड होऊन घरांचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.
ऐन गणेशोत्सवात कोकणवासीयांवर पावसाचं विघ्न
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अतिमुसळधार पावसाने काही रस्ते जलमय झाले आहे आहेत. तर काही ठिकाणी गावाकडे जाणारे रस्ते वाहून गेले आहेत, करजगाव दापोलीकडे येणारा रस्ता वाहून गेलाय आहे त्यामुळे या पंचकोशीचा संपर्क तुटला आहे. तर दुसरीकडे दापोली सारंग, दापोली हर्णे, दापोली बुरोंडी या या मार्गावर दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक थांबवावी लागली होती. दुसरीकडे ताडील कोंगळे हा रस्ता पूर्णपणे खचल्याने या गावाकडे जाणारी एसटी बंद आहे. दोन दिवसावर सण आल्यामुळे मोठ्या प्रमाणात मुंबईकर आपल्या गावाकडे येऊन दाखल झालेत परंतु अतिवृष्टीमुळे त्यांना अनेक अडचणी निर्माण झाल्या आहे.
नाशिकच्या ग्रामीण भागात पावसाचा धुमाकूळ
मालेगाव, मनमाड, नांदगाव, येवला, सटाणासह नाशिकच्या ग्रामीण भागात पावसाने धुमाकूळ घातला असून मंगळवार दुपारपासून पावसाला सुरूवात झाली होती. त्यानंतर पावसाचा जोर वाढला आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने या भागाला अक्षरशः झोडपून काढले. रात्रभर पावसाची संततधार सुरू होती. जोरदार पावसामुळे अनेक नदी नाल्याना पूर येऊन ते दुथडी भरून वाहत आहे. नांदगाव शहरातून वाहणारी शकांबरी आणि लेंडी नदीला पूर येऊन त्याचे पाणी नदी काठी असलेली बाजारपेठ, दुकाने, घरात पाणी शिरले. तर वखारी आणि दरेल येथे छोटे बंधारे फुटल्यामुळे त्याचे पाणी अनेक शेतात शिरल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
औरंगाबादमध्ये बाजारपेठ पाण्याखाली
औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. शहरात झालेल्या पावसाने शहरात नदी नाले भरले, त्यामुळे सखल भागात पाणी शिरले. पैठण गेट बरुदगर नाला भागातील अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले. पैठण परिसरातील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. रात्री 8 ते 11 वाजे पर्यंत जोरदार पावसाने हजेरी लावली. ग्रामीण भागातही कन्नड आणि सिल्लोड भागात काल दिवसभर पाणी असल्याने अनेक प्रकल्प ओवरफ्लॉव झाले आहेत. छोटे पूल पाण्याखाली गेल्याने रात्री अनेक गावांचा संपर्क अजून तुटलेला आहे.
बुलडाणा जिल्ह्यात 7 तारखेला झालेल्या पावसाने सर्वसामान्यांची दाणादाण उडवून टाकली आहे.. या पावसाने अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालं असल्याच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.. या पावसात बुलडाणा कुठं काय नुकसान झालं आहे. 1325 हेक्टर शेतीवरील पिकांचं नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. 327 घरांची पडझड झाली आहे. तर 105 नागरिकांचे स्थलांतरण करण्यात आले आहे.
खान्देशात ही मुसळधार
खान्देशात मंगळवारी दिवसभर पाऊसधारांनी नद्या – नाल्यांना पूर आला आहे.जामनेरात वादळासह पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे.तापी,पांझरा,बोरी,तितुरसह सर्वच नद्या ओसंडून वाहू लागल्या असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.