मुंबईत तिसरी लाट आली असून आता लोकांनी अधिकची खबरदारी घेण्याची गरज असल्याची घोषणा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. आता गणेशोत्सवाचा उत्सव येत असून यात लोकांनी हा सण घरीच साजरा करावा, मी सुद्धा माझ्या घरी गणपती बसवणार असून गणेशोत्सव घरीच साजरा करणार आहे, लोकांनीही नियमांची काळजी घ्यावी असं आवाहनही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले आहे. कारण मागच्या महिन्याच्या तुलनेत सप्टेंबरच्या 6 तारखेपर्यंत शहरात कोरोना रूग्णांचं प्रमाण हे 28 टक्क्यांनी वाढले आहे.
पहिल्या आणि दुसऱ्या लॉकडॉऊनमध्ये मुंबईत मोठ्या संख्येत कोरोना रूग्ण सापडले होते. मुंबई हा महाराष्ट्राचा हॉटस्पॉट ठरला होता. आता पुन्हा तिसरी लाट महापौरांनी घोषित केल्याने लोकांनी धसका घेतला आहे. त्याचबरोबर राज्यात काही ठिकाणी वेगवेगळ्या व्हायरसचे प्रकार सापडत असल्याने भविष्यात परिस्थिती आणखी हाताबाहेर जाऊ नये यासाठीही उपाययोजना केल्या जात आहे. महाराष्ट्रात नागपूरात कोरोनाचा कहर सुरू असून शहरात तिसरी लाट आली असल्याची माहिती पालकमंत्री नितिन राऊत यांनी दिली आहे.
त्यामुळे आता राज्याच्या इतर भागातही या कोरोनाचा प्रभाव वाढू नये, यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. मुंबईत सध्या गणेशोत्सवाची तयारी अनेक गणेश मंडळांकडून करण्यात येत आहे, मुंबईसाठी गणेशोत्सव हा महत्वाचा सण मानला जातो. त्यामुळे आता ऐन सणाच्या काळात तिसरी लाट आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आता महापौरांनी तिसऱ्या लाटेची घोषणा केल्याने याचा परिणाम रहादारी आणि इतर गोष्टींवर होईल, कदाचित भविष्यात लॉकडॉऊन लागण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.