भारतात लसीकरणाचा वेग वाढत चालला असून देशाने गेल्या 24 तासांत पुन्हा एकदा विक्रमी लसीकरणाची नोंद केली आहे. केंद्र सरकारनं दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात 1 कोटी 30 लाखांपेक्षाही अधिक लसी दिल्या आहेत. गेल्या वर्षभरापासून मंदावलेल्या लसीकरणाला वेग यायला सुरुवात झाल्याचं हे लक्षण असून हाच वेग कायम राहिला, तर लवकरात लवकर देशवासियांचं लसीकरण पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
1 कोटींपेक्षा अधिक लसीकरण
एका दिवसात एक कोटीपेक्षा अधिक नागरिकांना लसी देण्याचा विक्रम भारताने नोंदवण्याची ही चौथी वेळ आहे. यापूर्वी तीन वेळा एका दिवसात 1 कोटींपेक्षा अधिक लसी देण्याचा विक्रम भारताने नोंदवला होता. 27 ऑगस्टला भारतात पहिल्यांदा एका दिवसांत 1 कोटींपेक्षा अधिक लसी देण्यात आल्या होत्या. त्यानंतर 31 ऑगस्टलादेखील 1 कोटींपेक्षा अधिक लसीकरणाची नोंद झाली होती. त्यानंतर 6 सप्टेंबरला आणि 7 सप्टेंबरला 1 कोटींपेक्षा अधिक लसीकरण झालं आहे.