मंकीपॉक्स व्हायरसचा प्रादुर्भाव जगभरात झपाट्यानं वाढत आहे. लवकरच जगातील 20 हून अधिक देशांमध्ये मंकीपॉक्सची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. आतापर्यंत 200 हून अधिक मंकीपॉक्स प्रकरणांची पुष्टी झाली आहे. या नव्या संकटाच्या काळात मंकीपॉक्सचा व्हायरस भारतात अद्याप पोहोचलेला नाही ही दिलासादायक बाब आहे. देशात आतापर्यंत मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र, त्याची वाढती प्रकरणे पाहता त्याच्यापासून बचावाची तयारी जोरात सुरू झाली आहे. दरम्यान, एका भारतीय आरोग्य उपकरण निर्मात्याने दावा केला आहे की त्यांनी रीअल-टाइम मंकीपॉक्स शोधण्याचे किट विकसित केलं आहे.
माहितीनुसार, वैद्यकीय उपकरणे बनवणारी खाजगी कंपनी ट्रिविट्रान हेल्थकेअरने शुक्रवारी घोषणा केली की त्यांनी मंकीपॉक्सचा संसर्ग शोधण्यासाठी आरटी-पीसीआर आधारित किट विकसित केला आहे, जो काही मिनिटांत त्याचा संसर्ग ओळखू शकतो.
त्याच्या किटबद्दल माहिती देताना कंपनीनं सांगितलं की, ट्रिविट्रॉनचे मंकीपॉक्स रिअल-टाइम पीसीआर किट हे चार रंगांचे फ्लोरोसेंस आधारित किट आहे. यामध्ये घेतलेल्या नमुन्यामुळे स्मॉलपॉक्स आणि मंकीपॉक्समध्ये एकाच प्रतिक्रिया स्वरूपात फरक करता येतो. कंपनीच्या म्हणण्यानुसार त्याचा निकाल येण्यास 1 तास लागतो.
मंकीपॉक्स हा एके काळी फक्त आफ्रिकन देशांमध्ये आढळणारा आजार होता पण आता तो जगभर पसरताना दिसत आहे. मंकीपॉक्सच्या झपाट्याने वाढणाऱ्या केसेस पाहता जागतिक आरोग्य संघटनेनंही इशारा दिला आहे.