‘हा छत्रपती घराण्याचा अपमान नाही, संभाजीराजेंनी पक्ष स्थापन करणं अयोग्य’, शाहू महाराजांनी कान टोचले
छत्रपती घराण्याचे कोल्हापूर गादीचे राजे शाहू महाराजांनी आपले पुत्र युवराज संभाजीराजे छत्रपती यांचे उघडपणे कान टोचले आहेत. संभाजीराजेंनी स्वराज्य नावाच्या स्वतंत्र संघटनेची स्थापना केली आहे. या संघटनेचं रुपांतर भविष्यात पक्षातही होऊ शकतो, असा अंदाज त्यांनी दिला आहे. याशिवाय संभाजीराजेंनी काल पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. संभाजीराजेंच्या या सर्व कृतीवर त्यांचे वडील शाहू महाराजांनी नाराजी व्यक्त केली आहे. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करणं, किंवा स्वतंत्र पक्ष काढणं योग्य नसल्याचं शाहू महाराज म्हणाले आहेत.
‘माझ्या वडिलांचा मी आदरच करतो, पण…’, वडिलांच्या टीकेवर संभाजीराजेंची पहिली प्रतिक्रिया
छत्रपती घराण्याचे कोल्हापूर गादीचे वंशज आणि राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आता आपल्या वडिलांच्या टीकेवर ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. संभाजीराजे यांचे वडील शाहू महाराजांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपले पुत्र संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेलं विधान योग्य नसल्याचं म्हटलं. तसेच संभाजीराजेंनी स्वतंत्र पक्ष काढण्याचा निर्णयही अयोग्य होता, असं देखील ते म्हणाले. शाहू महाराजांच्या या टीकेवर आता संभाजीराजेंनी प्रतिक्रिया दिली आहे. आपले वडील जे बोलले त्यावर मी काही बोलू इच्छित नाही, अशी प्रतिक्रिया संभाजीराजेंनी दिली आहे.
नागपुरची लेक राष्ट्रकुल स्पर्धेत करणार भारताचे प्रतिनिधित्त्व
ट्रायथलिट संजना जोशी ही लंडनमधील बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या आगामी राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्त्व करणार आहे. ही 22 वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. भारतीय ट्रायथलॉन फेडरेशनने 17 वर्षीय संजना जोशी हिची अलीकडील प्रभावी कामगिरीच्या आधारे भारताचे प्रतिनिधित्त्व करण्यासाठी निवड करण्यात आली आहे.
स्वातंत्र्य सैनिकाच्या विधवा पत्नीने थेट राष्ट्रपतींकडे मागितली देह त्यागाची परवानगी
बनावट दस्तऐवज तयार करून मद्य विक्रीचा परवाना परस्पर दुसऱ्याच्या नावे केल्याने बीडमधील स्वातंत्र्यसैनिकाच्या 89 वर्षीय विधवा पत्नीने थेट राष्ट्रपतींकडे देह त्यागाची परवानगी मागितली आहे. याबाबत पीडित सत्यभामा शिंदे यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून आपली कैफियत मांडली आहे.
बीडच्या सत्यभामा शिंदे माणसांतल्या विकृती राक्षसी वृत्तीने आणि प्रशासनाने डोळ्यादेखत केलेली फसवणूक पाहून त्यांना अश्रू अनावर होत आहे. सत्यभामा यांचे पती हे स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांना विविध प्रमाणपत्रांनी गौरवण्यात देखील आलंय. स्वातंत्र्यानंतर रंगनाथ शिंदे यांना उदरनिर्वाहासाठी त्याकाळी मद्य विक्रीचा परवाना देण्यात आला. आष्टी येथे त्यांचा व्यवसाय आहे. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. मात्र सत्यभामा यांच्या पतीच्या निधनानंतर काही जणांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना हाताशी धरत बनावट कागदपत्रे तयार केली आणि परस्पर दुकान परवाना नावे केला.
मनसेचा पार पडला मेळावा, राज ठाकरेंनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले नवे आदेश
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे कामाला लागले आहे. आज त्यांनी मुंबई मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. यावेळी सरचिटणीस आणि उपाध्यक्षांना राज्यभरात दौरा करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसंच, राज ठाकरे एक पत्रक देणार आहे. हे पत्र सर्व कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवण्याची सूचना करण्यात आली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज पदाधिकारी मेळावा पार पडला. मुंबईतील वांद्रे रंगशारदा इथं हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात राज्यभरातून मनसे पदाधिकारी रंगशारदाला पोहचले होते. यावेळी राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना 25 मिनिटं मार्गदर्शनं केलं. या मेळाव्यानंतर बाळा नांदगावकर यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
श्वानाच्या तोंडात घुसला जगातील सर्वात विषारी साप
बऱ्याच सापांना तुम्ही दंश करताना, आपल्या शिकारीला गिळताना, विळखा घालताना पाहिलं असेल. पण एक साप चक्क एका श्वानाच्याच तोंडात घुसला. धक्कादायक म्हणजे हा जगातील दुसरा सर्वात विषारी साप होता. आपल्या श्वानाला सापापासून वाचवण्यासाठी मालकिणीने त्याच्या तोंडात हात टाकला पण तिच्यावरही सापाने हल्ला केला.
साप साप असतो. मग त्याला टीव्हीवर पाहा किंवा प्रत्यक्ष समोर. सापाला पाहून घाम फुटतोय ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडमध्ये राहणारी महिलाही आपल्या श्वानाच्या तोंडात सापाला पाहून घाबरली. श्वानाच्या तोंडात साप पाहून तिला धडकीच भरली. पण साप छोटासा होता, त्यामुळे तिला तो साधा वाटला. म्हणून भीती वाटली तरी तिने तो हातानेच श्वानाच्या तोंडातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सापाने तिच्या हाताला दंश केला.
अपघातात जखमी झालेल्या पतीला पाहायला जात होती पत्नी; समोरुन येणाऱ्या वाहनाने दिली जोरात धडक
पती-पत्नीचे नाते जीवनभराचे असते. मात्र, अनेकदा नियती या पत्नी-पत्नीच्या नात्यामध्ये असे काही घडवून आणते की, सर्वांनाच धक्का बसतो. अशीच एक दुर्दैवी बातमी यवतमाळ जिल्ह्यातून समोर आली आहे. अपघात झालेल्या पतीला पाहायला जाणाऱ्या पत्नीसोबत ही दुर्दैवी घटना समोर आली आहे. सपना रामेश्वर जाधव (रा. फुलउमरी, ता. मानोरा, जि. वाशिम) असे अपघातात मृत्यू झालेल्या पत्नीचे नाव आहे. सपना जाधव यांच्या पतीचा आणि सासऱ्याच्या दुचाकीचा अपघात झाला होता. यात ते दोन्ही किरकोळ जखमी झाले होते. यानंतर पतीने झालेल्या अपघाताबाबत आपल्या पत्नीला माहिती दिली आणि घरी येण्यास उशीर होईल, असेही सांगितले. मात्र, ही घटना ऐकल्यानंतर पत्नी अस्वस्थ झाली. तिला काळजी वाटू लागली. म्हणून ती आपल्या चुलत दिराच्या मोटरसायकलवर पतीला पाहण्यासाठी पुसदकडे निघाली होती. यानंतर रस्त्यात एक दुर्घटना घडली. वाटेत जात असताना तिचा अपघाती मृत्यू झाला.
शेतात आढळले 10 मोरांचे मृतदेह, नाशिकमधील दुर्दैवी घटना
राष्ट्रीय पक्षी असलेल्या 10 मोरांचे मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यातील नांदगावच्या आमोदे सतारी परिसरात घडली आहे. या घटनेमुळे पक्षी प्रेमीमध्ये खळबळ उडाली आहे. मृत मोरांमध्ये 4 नर आणि 6 मादीचा समावेश आहे. पाण्याविना किंवा उष्माघाताने मोरांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. तसंच विषबाधेतून या मोरांचा मृत्यू झाल्याचा दावाही केला जात आहे. नांदगाव तालुक्यातील आमोदे येथील सतारी शिवार परिसरात शनिवार 28 मे रोजी दहा मोरांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. ही माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन पंचनामा केला.
एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या, विहिरीत सापडले मृतदेह; मृतांमध्ये दोन महिला गर्भवती
राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. जयपूरच्या दुदू शहरात तीन महिला आणि दोन मुलांची हत्या करण्यात आली, त्यानंतर विहिरीतून एकूण 5 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृत्युमुखी पडलेल्या तीनपैकी दोन महिला गर्भवती होत्या. प्राथमिक माहितीनुसार, सासरच्या लोकांनी हुंड्याच्या लालसेपोटी तिन्ही महिला आणि दोन मुलांची हत्या केली आहे. ज्या महिलांचे (सर्व बहिणी) मृतदेह सापडले त्यात कालुदेवी आणि तिच्या दोन बहिणींचा समावेश आहे.
‘भाजप कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनमध्ये येण्यास मनाई आहे”, पोलीस स्टेशनबाहेर लागले बॅनर
यूपी, मेरठमध्ये शुक्रवारी एक विचित्र दृश्य पाहायला मिळालं. जेव्हा लोकांनी मेडिकल स्टेशनच्या भिंतीवर एक मोठा बॅनर लटकलेला पाहिला. बॅनरवर ‘भाजप कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनमध्ये येण्यास मनाई आहे (भाजप कार्यकर्ता का ठाणे में आना मना है)’ असे लिहिले होतं. या बॅनरवर स्टेशन प्रभारी संत शरण सिंह यांचे नाव लिहिले होते. पोलीस स्टेशनबाहेर टांगलेल्या या बॅनरला ट्विट करून सपा नेते अखिलेश यादव यांनी राज्यातील योगी सरकार ताशेरे ओढले.
आगामी साहित्य संमेलन वर्ध्याला, साहित्य महामंडळाच्या उद्याच्या बैठकीत शिक्कामोर्तब
विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दीनिमित्त आगामी ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा येथे घेण्यात येणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या रविवारी (२९ मे) होणाऱ्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार आहे. वर्धा येथे ५५ वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. तर, गेल्या अकरा वर्षांत विदर्भामध्ये होणारे हे तिसरे संमेलन असेल.
२ हजार रुपयांच्या नोटा चलनातून गायब; गेल्या आर्थिक वर्षात १२.६ टक्क्यांची घट, RBI चा खुलासा
२०१६ साली नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेनं २००० रुपये किमतीची नवीन नोट चलनात आणली होती. पण मागील काही दिवसांत अर्थव्यवस्थेतून दोन हजार रुपयांच्या नोटा गायब झाल्याचं निरीक्षण नुकतंच आरबीआयने नोंदवलं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ताज्या आकडेवारीनुसार, मार्च २०२२ च्या संपलेल्या आर्थिक वर्षात दोन हजार रुपयांच्या नोटात १२.६० टक्क्यांची घट झाली आहे. सध्या बाजारात २ हजार रुपयांच्या २१ हजार ४२० लाख नोटा आहेत.
गेल्या वर्षी हा आकडा २४ हजार ५१० लाख इतका होता. तर २०२० मध्ये अर्थव्यवस्थेत २७ हजार ३९८ लाख २ हजार रुपयांच्या नोटा होत्या. गेल्या दोन वर्षांत चलनात असलेल्या २ हजार रुपयांच्या नोटांच्या संख्येत २१.८१ टक्क्यांनी घट झाली आहे.
आम्ही महात्मा गांधी आणि सरदार पटेलांच्या स्वप्नातील भारत घडवण्याचा प्रयत्न केला – पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी राजकोट येथील एका रुग्णालयाचं उद्घाटन केलं. उद्घाटन केल्यानंतर त्यांनी देशाला संबोधित करताना सांगितलं की, गेल्या आठ वर्षांत आम्ही महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्वप्नातील भारत घडवण्याचा प्रयत्न केला. गेल्या आठ वर्षात आम्ही असं एकही काम केलं नाही, ज्यामुळे लोकांची मान शरमेनं झुकेल.
पंतप्रधान पुढे म्हणाले की, “आम्ही विविध योजनांच्या माध्यमातून देशातील गरीब जनतेची सेवा केली. त्यांचं जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न केला. कोविड -१९ साथीच्या काळात आम्ही गरीब जनतेसाठी देशातील अन्नधान्य साठा खुला केला आणि प्रत्येक नागरिकाचं लसीकरण केलं आहे.”
दिग्दर्शक रवी जाधव यांच्या आईचे निधन, वयाच्या ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता अशा विविधांगी भूमिका पार पाडणारा रवी जाधव हे नाव मराठी कलाविश्वासाठी नवीन नाही. आजवर त्यांनी अनेक उत्तम चित्रपटांची निर्मिती केली आहे. सतत चेहऱ्यावर स्मितहास्य असणाऱ्या दिग्दर्शक रवी जाधव याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रवी जाधव यांची आई शुभांगीनी जाधव यांचे आज निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ७४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रवी जाधव यांनी स्वत: पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे.
रवी जाधव यांनी इन्स्टाग्रामवर आईचा एक फोटो शेअर केला आहे. याला कॅप्शन देताना त्याने दोन तारखा शेअर केल्या आहेत. “आई… १९ जुलै १९४८ – २७ मे २०२२” असे त्यांनी या फोटोला कॅप्शन देताना म्हटले आहे. त्याच्या आईचे निधन झाल्याची बातमी कळताच अनेक चाहत्यांनी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.
SD Social Media
9850 6035 90