बीड जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका शेतकरी कुटुंबावर गावातीलच तीन ते चार जणांनी मिळून शुल्लक कारणावरुन अमानुषपणे मारहाण केली. या मारहाणीत पीडित शेतकरी, त्याची पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. या व्हिडीओत आरोपी किती निर्दयीपणे पीडित कुटुंबाला मारहाण करतात ते स्पष्टपणे दिसत आहे. पण काही कारणास्तव संबंधित व्हिडीओ या माध्यमावर आम्हाला प्रदर्शित करता येणार नाही. संबंधित व्हिडीओत आरोपींनी पीडितांना मारहाण करुन रक्तबंबाळ केलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांकडून संताप व्यक्त केला जातोय. आरोपींवर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.
संबंधित घटना ही जमिनीच्या शुल्लक वादातून घडली. आरोपींनी जमिनीच्या शुल्लक वादातून मागासवर्गीय कुटुंबावर लाठ्या-काठ्यांनी जीवघेणा हल्ला केला. ही घटना बीडच्या धारुर तालुक्यातील कोथिंबीरवाडी येथे घडली. मारहाणीची घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या मारहाणीत पती-पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर आंबेजोगाई येथील स्वराती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी दिंद्रुड पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धारुर तालुक्यातील कोथिंबीरवाडी येथील शेतकरी बालासाहेब रोहिदास उजगरे काल सकाळी शेतीत काम करत असताना शेजारील अजय भानुदास तिडके आणि सिद्धेश्वर भानुदास तिडके यांनी उजगरे यांच्या शेतात दगडे टाकण्यास सुरुवात केली. उजगरे यांनी त्यांना शेतात दगड टाकू नका म्हणुन सांगितलं असता आरोपींना राग आला. त्यांनी भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यानंतर आरोपींनी मारहाण करायला सुरूवात केली. आरोपींना पीडितांवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला. या मारहाणीत बालासाहेब उजगरे, त्यांची पत्नी शकुंतला उजगरे, मुलगा निखील उजगरे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.