शेती मालाच्या उत्पादनावरच त्याचे दर ठरतात. आवक वाढली की दरात घट आणि कमी झाली की वाढ हे बाजार पेठेचे सुत्रच आहे. यंदा वातावरणातील बदलाचा परिणाम मिरची उत्पादनावर झाला आहे. उत्पादनात घट झाली असून मिरीचीचे आगार असलेल्या नंदूरबारमध्ये दिवसाकाठी 300 क्विंटल लाल मिरचीची आवक होत आहे. तर 4 ते 5 हजार क्विंटल रुपये दर मिळत आहे. गतवर्षीच्या तुलनेत हे दर जरी दुप्पट असले तरी उत्पादनात घट झाल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न यामधून मिळालेले नाही. शिवाय लाल मिरचीचा हंगाम हा अंतिम टप्प्यात आहे. शिवाय लाल मिरची शिल्लकही नाही त्यामुळे आगामी काळात दरात वाढ होईल अशी अपेक्षा व्यापारी व्यक्त करीत आहे.
नंदूरबार जिल्ह्यामध्ये तब्बल 2 हजार 500 हेक्टरावर मिरचीची लागलवड केली जाते. जून महिन्यामध्ये लागवड केली जाते. लागवडीनंतर तीन ते चार महिन्यांमध्ये हिरव्या मिरचीचे उत्पादन घेतले जाते. डिसेंबर महिन्यापर्यंत हिरव्या मिरच्याचे उत्पादन घेतले जाते त्यानंतर महिन्याभरातच लाल मिरचीचे उत्पादन सुरु होते. लाल मिरची ही झाडावरच लाल झाल्यावर तिच्या तोडणीला सुरवात होते. साधारणत: जानेवारी अखेरीस ही काढणी सुरु होते. मात्र, यंदा या दरम्यान तापमानात मोठी घट झाली होती त्याचा परिणाम उत्पादनावर झाला होता.
नंदूरबार बाजार समितीमध्ये हंगामाच्या सुरवातीला लाल मिरचीची मोठ्या प्रमाणात आवक झाली होती. त्यामुळे दरात घसरण झाली होती. सुरवातीला 1800 ते 2000 रुपये प्रति क्विंटलचा दर होता. मात्र, पुन्हा वातावरणातील बदलामुळे उत्पादनात घट होताच दरात वाढ होण्यास सुरवात झाली होती.त्यामुळे सध्या लाल मिरचीचा ठसका 4 ते 5 हजार रुपये क्विंटलवर गेला आहे.
नंदूरबार बाजार समितीमध्ये केवळ जिल्ह्यातूनच नव्हे तर परराज्यातूनही मिरचीची आवक होत असते. यंदा मात्र, हंगामाच्या सुरवातीपासूनच स्थानिक पातळीवरीलच मिरचीची आवक होती. पण ही आवक कायम राहिलेली नाही. मागणी वाढली आणि दुसरीकडे आवक कमी होत गेली. त्यामुळे दोन महिन्यामध्ये 1800 ते 2000 रुपये क्विंटलवर असलेली मिरची आता 5 हजार रुपयांवर गेली आहे. त्यामुळे उत्पादन घटले तरी वाढीव दरामुळे शेतकऱ्यांना आधार मिळालेला आहे.