प्रसिद्ध अभिनेते ज्युनिअर मेहमुद यांचं कर्करोगामुळे निधन, हरहुन्नरी कलावंत काळाच्या पडद्याआड
प्रसिद्ध अभिनेते ज्युनिअर मेहमुद यांचं कर्करोगाने निधन झालं आहे. त्यांची प्रकृती खालावल्याच्या बातम्या समोर आल्याच होत्या. अभिनेते सचिन पिळगावकर आणि जितेंद्र यांच्यासह ज्युनिअर मेहमुद यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. सचिन आणि ज्युनिअर मेहमुद हे बालपणीचे मित्र होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी सचिन यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर सचिन पिळगावकर यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती. आज ज्युनिअर मेहमुद यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, दोन मुलं, सुना आणि एक नातू असा परिवार आहे. नईम सय्यद हे ज्युनियर मेहमुद या नावाने प्रसिद्ध होते. त्यांना ‘ज्युनियर मेहमुद’ हे नाव त्यांना मेहमुद अली यांनी दिले होते. त्यांनी ७ वेगवेगळ्या भाषांमधील तब्बल २६५ चित्रपटांमध्ये काम केलं असून ६ मराठी चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शनही केलं होतं.
मराठवाड्यातील शेती संकटात, देशभरातील ३१० जिल्ह्यांना बदलत्या पर्यावरणाचा फटका
सतत बदलत जाणार्या पर्यावरणाचा फटका मराठवाड्यातील शेती व्यवसायाला सहन करावा लागणार आहे. पर्यावरणातील बदलामुळे शेतीसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. देशातील २८ राज्यांतील ३१० जिल्ह्यांना या संकटाचा सामना करावा लागत आहे. यात मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यासह लातूर, हिंगोली, परभणी, जालना, बीड आणि नांदेड या सात जिल्ह्यांचा समावेश आहे. बीड आणि नांदेड जिल्ह्यातील परिस्थिती सर्वात बिकट असल्याची माहिती देशाचे कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली आहे.
इलेक्ट्रीकल्स पोल्स निर्मितीच्या आडून अंमली पदार्थांची निर्मिती,१०७ कोटींचे एमडी ड्रग जप्त
अलिबाग येथे पोल्स निर्मितीच्या आडून अंमली पदार्थ निर्मिती करण्याचा कारखाना तीन जणांनी सुरू केला होता. यातून एमडी पावडरची निर्मिती मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सरकारी यंत्रणांची नजर चुकवत मेफेड्रोन तयार केले जात होते. मात्र रायगड पोलीसांना याचा सुगावा लागताच त्यांनी कंपनीवर धाड टाकली आणि १०७ कोटींची एमडी पावडर जप्त केली.खोपोलीच्या ढेकू गावाच्या हद्दीत ‘इंडीया इलेक्ट्रीक पोल्स मॅन्युफॅक्चरींग कंपनी’चा फलक आहे. या कंपनीत आतमध्ये ‘आंचल केमिकल’ नावाची दुसरी एक कंपनी सुरू होती. या कंपनीत बेकायदेशीरपणे प्रतिबंधित अंमली पदार्थ बनविले जात असल्याची खबर पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी कंपनीवर गुरूवारी रात्री छापा टाकला. यावेळी कंपनीत उग्र वास येत असल्याचे पोलीसांच्या निदर्शनास आले. कंपनी प्रशासनाकडे विचारणा केली असता त्यांच्याकडे रासायनिक प्रक्रिया करून पदार्थ बनवण्याची कुठलीही वैध परवानगी नसल्याचे दिसून आले. मात्र रासायनिक प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारून या ठिकाणी गुंगीकारक आणि प्रतिबंधीत मेफेड्रोन अर्थात एमडी तयार केले जात असल्याचे दिसून आले.
नवाब मलिकांना झिडकारल्यावर प्रफुल्ल पटेलांवरून भाजपपुढे ‘धर्म’संकट !
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांचे कुख्यात दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याच्या कारणावरून झिडकारल्यानंतर दाऊदचाच सहकारी इक्बाल मिर्चीशी जमीनव्यवहार केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत काय भूमिका घ्यायची, असे धर्मसंकट भाजपपुढे उभे राहिले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहीलेले पत्र थेट प्रसिद्धीमाध्यमांपुढे उघड करून पंचाईत केल्याने हा वाद भाजप पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहचला आहे.
भारतीय वंशाच्या व्यवस्थापकाचा अमेरिकन फूटबॉल क्लबला १८३ कोटींचा गंडा
भारतीय वंशाच्या एका व्यक्तीवर अमेरिकेत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय वंशाच्या व्यवस्थापकावर अमेरिकेतील प्रसिद्ध फूटबॉल क्लबला २.२० कोटी डॉलर्सचा (जवळपास १८३ कोटी रुपये) गंडा घातल्याचा आरोप आहे. या व्यक्तीने फूटबॉल क्लबला कोट्यवधी डॉलर्सचा गंडा घालून ते पैसे स्वतःसाठी वापरले आहेत. या पैशातून त्याने आलिशान गाड्या आणि महागड्या वस्तू खरेदी केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. अमित पटेल असं या आरोपीचं नाव असून तो जॅक्सनविले जग्वार्स फूटबॉल क्लब ऑफ अमेरिकाचा आर्थिक व्यवस्थापक होता. अमित पटेल हा २०१८ मध्ये या फूटबॉल क्लबचा आर्थिक व्यवस्थापक म्हणून रुजू झाला आणि त्याने दोन वर्षे या पदावर काम केलं. यंदा फेब्रुवारी महिन्यात क्लबने त्याला नोकरीवरून काढून टाकलं. तसेच त्याच्याविरोधात जॅक्सनविले जिल्हा न्यायालयात तक्रार दाखल केली. पटेलविरोधात दाखल केलेल्या दस्तावेजांनुसार अमित पटेलवर आरोप आहे की त्याने क्लबच्या पैशांचा स्वतःसाठी वापर केला आहे. पटेल हा क्लबचा एकमेव प्रशासक होता. या पदावर असताना त्याने संघातील खेळाडूंसाठी साहित्य खरेदी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या व्हर्च्युअल क्रेडिट कार्डचा वापर त्याच्या खासगी खरेदीसाठी केला.
सहा वर्षांनी एकत्र आले डॉ. गुलाटी व कपिल शर्मा
कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. जवळपास ६ वर्षांनंतर ही जोडी एकत्र दिसणार आहे. सहा वर्षांनी कपिल व सुनील यांच्यातील सर्व मतभेद संपले आहेत आणि ते नव्या शोमध्ये प्रेक्षकांना खळखळून हसवताना दिसणार आहेत. भांडणानंतर अनेक वर्षांनी सुनील ग्रोव्हर आणि कपिल शर्मा पडद्यावर एकत्र येत आहेत. दोघेही ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर नवीन शोमधून प्रेक्षकांना हसवण्यासाठी येणार आहेत.
३७ वर्षांनी धर्मेंद्र यांना मिळाला फिल्मफेअर पुरस्कार!
बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे कायम चर्चेत असतात. या वयातही असलेला कमालीचा फिटनेस आणि अभिनयाची दांडगी इच्छाशक्ति यामुळेच आजही धर्मेद्र ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’सारख्या चित्रपटातून आपली छाप सोडतात. आज धर्मेद्र हे त्यांचा ८८ वा वाढदिवस साजरा करत आहेत. बॉलिवूडचा एक सुवर्णकाळ त्यांनी पाहिला आहे अन् त्या काळात त्यांनी एकाहून एक असे सुपरहीट चित्रपट दिले आहेत.१९६० पासून आपल्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात करणाऱ्या धर्मेंद्र यांनी ३०० हून अधिक चित्रपटात काम केलं आहे. एवढी मोठी करिकीर्द असूनही धर्मेंद्र यांना ३७ वर्षांनी केवळ एकच फिल्मफेअरचा लाईफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळाला. जेव्हा धर्मेंद्र यांना हा पुरस्कार देण्यात आला तेव्हा त्यांनी त्यांची एक धमाल आठवण त्यावेळी मंचावर सगळ्यांसमोर शेअर केली.
खासदार महुआ मोईत्रा लोकसभेतून बडतर्फ; समितीचा अहवाल येताच काही तासांतच निर्णय
लोकसभेत आज महुआ मोईत्रा यांच्याशी संबंधित असलेला कॅश फॉर क्वेरी प्रकरणावरील नीतिमत्ता समितीचा अहवाल लोकसभेत मांडला गेला. समितीच्या अहवालात मोईत्रा यांना बडतर्फ करण्यात यावे, अशी शिफारस करण्यात आली होती. मोईत्रा यांनी लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी व्यावसायिक हिरानंदानी यांच्याकडून रोख रक्कम आणि महागड्या भेटवस्तू घेतल्या होत्या, असा आरोप ठेवण्यात आला होता. एवढेच नाहीतर मोईत्रा यांनी हिरानंदानी यांना संसदेकडून दिले जाणारा लॉग-इन आयडी व पासवर्ड दिला होता. त्यावरून हिरानंदानी यांनी अदानी समूहासंदर्भात प्रश्न विचारले होते. त्याबदल्यात मोईत्रा यांनी लाच घेतल्याचा आरोप दुबेंनी लोकसभाध्यक्षांना पत्र लिहून केला होता. या पत्राच्या आधारे लोकसभाध्यक्षांनी हे प्रकरण नैतिकता समितीकडे सोपविले होते.
“भारतातच करा डेस्टिनेशन वेडिंग”, पंतप्रधानांचं धनाढ्यांना आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमध्ये आयोजित दोन दिवसीय ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटचं उद्घाटन केलं. या परिषदेत भारतासह जगभरातील गुंतवणूकदार आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. या परिषदेच्या उद्घाटनाच्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी भारतातल्या परदेशी गुंतवणुकीवर भाष्य केल. तर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले, आम्ही या परिषदेसाठी आलेल्या गुंतवणूकदारांबरोबर २.५ लाख कोटी रुपयांच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. आतापर्यंत ४४,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीवर यशस्वी बोलणी झाली आहे.दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडला परफेक्ट वेडिंग डेस्टिनेशन (विवाह करण्यासाठीचं उत्तम ठिकाण) म्हटलं आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, मी या देशातल्या धनाढ्य लोकांना सांगू इच्छितो की, लोकांची लग्न होतात, तेव्हा त्यांच्या जोड्या ईश्वराने बनवलेल्या असतात, असा आपला समज आहे. परंतु, मला एक गोष्ट कळत नाही की, देव लोकांच्या जोड्या बनवतो तर मग या जोड्या त्यांच्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी (डेस्टिनेशन वेडिंग करण्यासाठी) परदेशात का जातात? ते इथे देवभूमीवर लग्न का करत नाहीत? देवाच्या दारात लग्न करण्याऐवजी परदेशात का जातात?
सुधा मूर्ती यांनी पहिल्यांदाच केला संसद दौरा
इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आणि इंजिनिअर तसंच प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांनी आज नव्या संसद भवनाचा दौरा केला. जुनी संसद इमारत आणि नवी संसद इमारत त्यांनी पाहिली. ज्यानंतर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांनाही उत्तरं दिली. ANI शी बोलताना त्यांनी नव्या संसद इमारतीचं कौतुक केलं. “ही इमारत खूपच सुंदर आहे. मला प्रदीर्घ काळापासून या ठिकाणी भेट द्यायची होती आज योग आला” असं सुधा मूर्ती यांनी म्हटलं आहे.
२४ चेंडूत शतक अन् ४३ चेंडूत… हमजा सलीम दारने एकाच सामन्यात मोडले अनेक विक्रम
युरोपियन क्रिकेट मालिकेतील ४५ व्या सामन्यात मंगळवारी सोहल हॉस्पिटलटेट आणि कॅटालोनिया जग्वार आमनेसामने होते. या सामन्यात कॅटालोनिया जग्वारचा सलामीवीर हमजा सलीम दारने अवघ्या ४३ चेंडूत नाबाद १९३ धावांची खेळी करत विक्रमांची रांग लावली. त्याने अवघ्या २४ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्यामुळे कॅटालोनिया जग्वार संघाने हा सामना १५७ धावांनी जिंकला. सलीमच्या १९३ धावाशिवाय यासिल अलीने ५८ धावांचे योगदान दिले. यासिरने १९ चेंडूत नाबाद ५८ धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून तीन चौकार आणि सात षटकार आले. त्याचा स्ट्राइक रेट ३०५.२६ होता.
गौतम गंभीरवर टीका करणे श्रीसंतला पडले महागात, एलएलसी आयुक्तांनी बजावली कायदेशीर नोटीस
लिजेंड्स लीग क्रिकेट २०२३ (एलएलसी २०२३) स्पर्धेतील गौतम गंभीर आणि श्रीसंत यांच्यातील वादाने आता नवे वळण घेतले आहे. टीम इंडियाच्या या दोन माजी क्रिकेटपटूंमध्ये बुधवार, ६ डिसेंबर रोजी मैदानावर जोरदार वादावादी झाली. यानंतर श्रीसंतने सोशल मीडियावर गंभीरवर निशाणा साधला. तो इन्स्टाग्रामवर लाइव्ह आला आणि म्हणाला की गंभीरने त्याला फिक्सर म्हटले होते. श्रीसंत इथेच थांबला नाही. त्याने गौतम गंभीरच्या एका इन्स्टाग्राम पोस्टवर कमेंट केली आणि बरेच काही सांगितले.आता अशा बातम्या येत आहेत की, ज्यामुळे टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज अडचणीत सापडला आहे. लिजेंड्स लीग क्रिकेटने या गोलंदाजाला कायदेशीर नोटीस बजावली आहे. जोपर्यंत सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ हटवला जात नाही तोपर्यंत या विषयावर कोणतीही चर्चा होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. एवढेच नाही, तर पंचांनी दिलेल्या अहवालात श्रीसंतच्या दाव्यासारखे काहीही आढळले नाही.
शेअर बाजारातील उत्साहानं बँक निफ्टी निर्देशांकाने गाठला उच्चांक, नवा इतिहास रचला
देशांतर्गत शेअर बाजारातील उत्साही वातावरणामुळे दररोज नवनवे विक्रम निर्माण होत आहेत. ऐतिहासिक आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशीही नवा विक्रम नोंदवला गेला आणि हा विक्रम बँक निफ्टी निर्देशांकाने केला. शुक्रवारच्या व्यवहारादरम्यान बँक निफ्टी निर्देशांकाने नवीन ऐतिहासिक उच्चांक गाठला.व्यवहारादरम्यान बँक निफ्टी निर्देशांकाने १ टक्क्यानं उसळी घेत ४७,३०३.६५ अंकांची पातळी गाठली. बँक निफ्टीची ही नवीन उच्च पातळी आहे. बँक निफ्टी निर्देशांक या आठवड्यात ५ टक्क्यांहून अधिक वाढला आहे. जुलै २०२२ नंतर बँकिंग निर्देशांकाचा हा सर्वात मोठा साप्ताहिक नफा आहे. यावर्षी बँकिंग निर्देशांक ९ टक्क्यांनी वाढला आहे. वार्षिक आधारावर बँकिंग निर्देशांक बेंचमार्क निफ्टी ५० पेक्षा कमी आहे, ज्याने यावर्षी आतापर्यंत ९ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली आहे. व्यवहारादरम्यान बँक निफ्टी निर्देशांकाने ०.९ टक्क्यानं उसळी घेत ४७२६२ अंकांची पातळीवर बंद झाला.
चंदा कोचर यांना सेवानिवृत्तीचे लाभ मिळणार नाहीत, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
ICICI च्या माजी सीईओ चंदा कोचर यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. शुक्रवार ८ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने ICICI बँकेच्या माजी सीईओ आणि एमडी चंदा कोचर यांनी सेवानिवृत्ती लाभांबाबत दाखल केलेली याचिका फेटाळली. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले, ज्यामध्ये न्यायालयाने कोचर यांचा सेवानिवृत्तीनंतरच्या लाभासाठी केलेला अंतरिम अर्ज फेटाळला होता. कोचर यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय अन्यायकारक असल्याचा युक्तिवाद केला. साळवे म्हणाले की, बँकेने सुरुवातीला कोचर यांना सेवानिवृत्तीचे लाभ देऊ केले होते, परंतु नंतर ते रद्द केले.
बाबा रामदेव १० हजार कोटींची गुंतवणूक करणार, हजारो रोजगाराच्या संधी निर्माण होणार
पतंजलीचे संस्थापक आणि योगगुरू बाबा रामदेव येत्या काही दिवसांत १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. विकसित भारत निर्माण करण्याच्या आपल्या संकल्पाचा पुनरुच्चार करताना ते म्हणाले की, प्रस्तावित गुंतवणुकीमुळे हजारो लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.
मोदी सरकारचा मोठा निर्णय, कांद्याच्या निर्यातीवर ३१ मार्च २०२४ पर्यंत घातली बंदी
केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. देशांतर्गत उपलब्धता वाढवणे आणि किमती नियंत्रणात राहण्याच्या उद्देशाने सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार पुढील वर्षी मार्चपर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. आज परदेशी व्यापार महासंचालनालयाने एका अधिसूचनेत म्हटले आहे की, कांद्याच्या निर्यात धोरणात ३१ मार्च २०२४ पर्यंत मोफत निर्यात प्रतिबंधित करण्यासाठी सुधारणा करण्यात आली आहे.डीजीएफटीने असेही म्हटले आहे की, त्यांच्या विनंतीवरून सरकारने दिलेल्या परवानगीच्या आधारे इतर देशांना कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली जाणार आहे. या अधिसूचनेनुसार, निर्यातबंदी अधिसूचनेपूर्वी ज्या कांद्याची लोडिंग सुरू झाली होती, अशा कांद्याची निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
RBI ने रुग्णालय अन् शिक्षण संस्थांसाठी UPI व्यवहार मर्यादा वाढवली, आता ५ लाखांपर्यंत पेमेंट करता येणार
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देशात UPI च्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. यामुळेच दर महिन्याला UPI व्यवहारांची संख्या वाढत आहे. आरबीआयने ऑफलाइन व्यवहारांसाठी UPI मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) वापरण्यास प्रोत्साहन दिले आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी पतधोरणाच्या बैठकीत सांगितले की, रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांमधील UPI व्यवहाराची मर्यादा ५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणाही त्यांनी केली.RBI च्या नव्या निर्णयानंतर आता UPI च्या मदतीने हॉस्पिटल आणि शैक्षणिक संस्थांमध्ये जास्त पेमेंट करता येणार आहे. नव्या धोरणानुसार, आता या ठिकाणी प्रत्येक व्यवहारासाठी १ लाख रुपयांऐवजी ५ लाख रुपयांपर्यंत UPI द्वारे पेमेंट करता येणार आहे. या निर्णयामुळे या संस्थांमध्ये यूपीआयच्या वापराला चालना मिळणार आहे. रुग्णालयाची बिले आणि शाळा-कॉलेजची फी भरताना होणारी गैरसोय कमी होणार आहे.