भारत पुन्हा एकदा अवकाश कवेत घेणार ! ISRO ने २०२५ पर्यंत १२ मोहिमा आखल्या
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) यावर्षात अनेक ऐतिहासिक मोहिमा फत्ते केल्या. इस्रोने चांद्रयान-३ ही सर्वात मोठी चांद्रमोहीम फत्ते केली. या मोहिमेद्वारे भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग करणारा जगातला पहिलाच देश ठरला आहे. त्यापाठोपाठ आदित्य-एल१ हे अवकाशयान सूर्याच्या दिशेने पाठवलं. त्यानंतर इस्रोने गगनयान मोहिमेची चाचणी यशस्वी केली आहे. आता इस्रो आणखी काही मोहिमा फत्ते करण्याच्या तयारीत आहे.इस्रो पुढच्या दोन वर्षांमध्ये कोणकोणत्या मोहिमा राबवणार याबाबतची माहिती समोर आली आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासावेळी केंद्र सरकारने पुढच्या दोन वर्षांतील इस्रोच्या मोहिमांची माहिती दिली. इस्रोने २०२४ आणि २०२५ साठी ज्या मोहिमा आखल्या आहेत, याबाबत विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी माहिती दिली. यापैकी निसार आणि गगनयान मोहिमेची बरीच चर्चा होत आहे.
चीनमधल्या गूढ आजाराचा भारतात प्रवेश?
चीनच्या वुहान शहरातून आलेल्या करोना विषाणूने संपूर्ण जग हादरवलं होतं. दीड ते दोन वर्ष संपूर्ण जगभर लॉकडाऊन लावण्यात आल्याचं सर्वांनीच पाहिलं आहे. आता पुन्हा एकदा चीनमधील एका गूढ विषाणूने लोकांच्या चिंता वाढल्या आहेत. हा गूढ विषाणू भारतात सापडल्याच्या बातम्यांनी लोकांना चिंतेत टाकलं आहे. चीनमधील न्यूमोनिया विषाणूने भारतात प्रवेश केला असून सात भारतीयांना या आजाराची लागण झाल्याचं वृत्त अनेक वृत्तवाहिन्या आणि वृत्तसंकेतस्थळांनी प्रसिद्ध केलं आहे. दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात या गूढ आजाराने ग्रस्त रुग्ण आढळल्याचा दावा वेगवेगळ्या वृत्तांमध्ये करण्यात आला आहे. परंतु, हे वृत्त खोटं असल्याचं एम्स रुग्णालयाने म्हटलं आहे.
काँग्रेसच्या रेवंत रेड्डी यांनी घेतली तेलंगणच्या मुख्यमंत्री पदाची शपथ
विधानसभा निवडणुकीत सत्तांतर घडून आलेल्या तेलंगणात मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचाही कार्यक्रम पार पडला आहे. काँग्रेस नेते रेवंत रेड्डी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर, भट्टी विक्रमारका यांनी उपमुख्मयंत्री पदाची शपथ घेतली आहे. या शासकीय कार्यक्रमासाठी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी उपस्थित होते.हैदराबाद येथील एल बी स्टेडिअम येथे दुपारी १ वाजता शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. राज्यपाल तिमिलिसाई सुंदररंजन यांनी रेवंथ रेड्डी यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. ५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री पदासाठी रेवंथ रेड्डी यांच्या नावाची काँग्रेसकडून औपचारिक घोषणा झाली होती. हैदराबादमध्ये काँग्रेस पक्षाची बैठक झाली. तिथे सर्वानुमते रेवंत रेड्डी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं.
‘T20 World Cup 2024’चा लोगो आयसीसीने केला लाँच, वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये होणार स्पर्धेचे आयोजन
नुकतीच आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धा पार पडली. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात १९ नोव्हेंबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत करत विश्वचषकावर नाव कोरले. त्यामुळे भारतीय चाहत्यांच्या पदरी निराशा आली. आता चाहत्यांना टी-२० विश्वचषकाची उत्सुकता लागली आहे. आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषकाचा आगामी हंगाम वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये आयोजित केला जाणार आहे. आयसीसीने आगामी स्पर्धेचा नवीन लोगोही जारी केला आहे.आयसीसीने एक व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. त्याचबरोबर जॉन्स नावाच्या एका युजर्सने सोशल मीडियावर नवीन लोगोचे छायाचिकत्र शेअर केले आहे. त्याने हा फोटो एक्सवर शेअर करताना यूजर्सनी लिहिले आहे की, ‘टी-२० विश्वचषक २०२४ चा लोगो….!!!!!’ सर्वांच्या नजरा अमेरिका आणि वेस्ट इंडिजवर आहेत.
उसाच्या रसापासून इथेनॉलच्या निर्मितीवर मोदी सरकारने घातली बंदी
देशात साखरेचे दर वाढल्यानंतर आणि उसाच्या उत्पादनात घट झाल्यानंतर मोदी सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने जूनपासून उसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबाबत अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. या निर्णयानंतर देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल, असे मानले जात आहे.
रतन टाटांच्या आणखी एका कंपनीने केला विक्रम
आठवडाभरानंतर टाटा समूहाच्या आणखी एका कंपनीचे बाजारमूल्य १ लाख कोटींच्या पुढे गेले. ट्रेडिंग सत्रात कंपनीचे शेअर १३ टक्क्यांनी घसरले. यामुळे कंपनीच्या शेअर्सने ३३२ रुपयांचा उच्चांक गाठला. यामुळेच कंपनीचे बाजार मूल्य १ लाख कोटींच्या पुढे गेले. आठवडाभरापूर्वी ट्रेंटचे बाजारमूल्य १ लाख कोटींच्या पुढे गेले होते. टाटा समूहाच्या ६ कंपन्यांचे बाजारमूल्य आता एक लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे.टाटा पॉवरच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली. याचे महत्त्वाचे कारण जेएम फायनान्शिअलने शेअरचे रेटिंग अपग्रेड केले आहे. त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये आज १३ टक्क्यांनी वाढ झाली आणि कंपनीच्या शेअर्सने ५२ आठवड्यांच्या विक्रमी उच्चांकी ३३२ रुपयांवर पोहोचला. बाजार बंद होईपर्यंत कंपनीचे शेअर्स १०.७६ टक्क्यांच्या वाढीसह ३२५.७५ रुपयांवर आहेत. मात्र, आज कंपनीचे शेअर्स २९५.९० रुपयांवर उघडले. एका दिवसापूर्वी कंपनीचे शेअर्स २९४.१० रुपयांवर बंद झाले होते.
अखेर मुक्ता-सागरचा पार पडला साखरपुडा; एकमेकांना घातली स्पेशल अंगठी
‘स्टार प्रवाह’वरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं. अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने साकारलेली मुक्ता, राज हंचनाळेने साकारलेला सागर तसेच इतर पात्र आता घराघरात पोहोचले आहेत. मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे. आता लवकरच मालिकेत शुभकार्य सुरू होणार आहे. गोखले-कोळी कुटुंबात लग्नीनघाईला सुरुवात झाली आहे. मुक्ता-सागरचा साखरपुडा पार पडला आहे. दोघांनी एकमेकांना स्पेशल अंगठी घातली आहे. याचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
SD Social Media
9850603590