शेतकरी प्रश्न, आरक्षण अन् कायदा सुव्यवस्थेवरून अधिवेशन गाजणार
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून (७ डिसेंबर) नागपूरच्या विधानभवनात होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर शासकीय नियमानुसार राज्य सरकारकडून आज विरोधी पक्षातील नेत्यांना चहापानाचं आमंत्रण देण्यात आलं होतं. परंतु, या चहापानाच्या कार्यक्रमाला विरोधी पक्षांनी नेहमीप्रामणे बहिष्कार टाकला आहे. महाविकास आघाडीतर्फे आज (६ डिसेंबर) संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अधिवेशन काळात कोणते मुद्दे ठेवणार याविषयी माहिती दिली.
राज्यातील पतसंस्थांना “बुस्टर डोज!” ठेवीदारांना सुरक्षिततेची खात्री व अडचणीतील पतसंस्थांना पाठबळ
राज्यातील बहुराज्यीय सहकारी पतसंस्थांच्या स्थैर्यासाठी ‘ॲसेट रिकन्स्ट्रक्शन को-ऑपरेटिव्ह सोसायटी’ स्थापन करण्यात आली आहे. यासाठी मल्टीस्टेट पतसंस्था फेडरेशनने पुढाकार घेतला असून १०० कोटींचे भागभांडवल उभारण्यात आले आहे. यामुळे ठेवीदारांना सुरक्षिततेची खात्री व अडचणीतील पतसंस्थांना पाठबळ मिळणार आहे.
देशातील आघाडीची पतसंस्था असलेल्या बुलडाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक यांनी ही माहिती दिली. यासंदर्भात नुकतीच मल्टीस्टेट पतसंस्था फेडरेशनची निर्णायक ऑनलाईन बैठक घेण्यात आली. त्यात हा निर्णय घेऊन ‘एआरसी’ची आचारसंहिताही निश्चित करण्यात आली आहे. बैठकीस फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे, राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश उपाख्य काका कोयटे, फेडरेशन ऑफ मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटीचे संचालक जितेंद्र जैन, आदी उपस्थित होते. बैठकीअंती एआरसी अर्थात ॲसेट रिकन्स्ट्रक्शन को-ऑप. सोसायटीची सहकारी तत्त्वावर स्थापना करण्यात आली आहे. देशातील राष्ट्रीयीकृत सहकारी व खासगी बँकांकरिता ॲसेट रिकन्स्ट्रक्शन को-आप. सोसायटी कंपनीची संकल्पना आहे. त्याच पद्धतीने ही संस्था कार्यरत राहणार आहे. त्यासाठी १०० कोटी रुपयांचे भाग भांडवल जमा करण्यात आले असल्याची माहितीही चांडक यांनी दिली. एआरसीची येत्या सहा महिन्यात केंद्रीय निबंधकांकडून नोंदणी करण्यात येणार आहे.
शिंदे समितीचा आज हैदराबाद दौरा; मराठा आरक्षणसंदर्भात सरकारच्या हालचाली
कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी अशा नोंदी असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्रे देण्यासंदर्भात आणखी पुरावे मिळविण्यासाठी न्या. संदीप शिंदे समिती बुधवारी हैदराबादला जाणार आहे. तेलंगणा सरकारकडून निजामकालीन कागदपत्रांमध्ये उर्दू किंवा अन्य भाषांमध्ये असलेल्या नोंदी मिळविण्यासाठी ही समिती जाणार आहे.
“मुलांची झोप पुरेशी व्हावी, या दृष्टीने शाळांच्या वेळा बदलण्याबाबत विचार व्हावा,” राज्यपालांच्या सूचना
अलीकडच्या काळात सर्वांच्याच झोपेच्या वेळा बदलल्या आहेत. मध्यरात्रीनंतरही मुले जागी राहतात. परंतु, शाळांसाठी त्यांना लवकर उठावे लागते व त्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही. मुलांची झोप चांगली व्हावी या दृष्टीने शाळांच्या वेळा बदलण्याबाबत विचार व्हावा, अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केली.
“मुलांच्या दप्तराचा भार हलका करण्यासाठी ‘पुस्तक – विहीन’ शाळा, ई – वर्ग यांना चालना द्यावी. तसेच शाळांचे गुणवत्तेनुसार श्रेणीकरण करावे,” अशाही सूचना राज्यपालांनी केल्या.
‘फायटर’मधला अनिल कपूर यांचा फर्स्ट लूक रिलीज, ‘अॅनिमल’ नंतर पुन्हा एकदा दिसणार दमदार भूमिकेत
हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांच्या आगामी ‘फाइटर’ चित्रपटात अनिल कपूर यांचाही महत्त्वाचा रोल आहे. निर्मात्यांनी अनिल कपूर यांचा फर्स्ट लुक शेअर केला आहे. त्यात अनिल कपूर दमदार लूकमध्ये पाहायला मिळतात. बॉलिवूडचे ‘मिस्टर इंडिया’ त्यांच्या नुकत्याच आलेल्या ‘अॅनिमल’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटात ते रणबीर कपूरच्या वडिलांच्या भूमिकेत पाहायला मिळतात. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे.’फायटर’मध्ये अनिल कपूर ‘ग्रुप कॅप्टन राकेश जय सिंग’ची भूमिका साकारत आहेत. निर्मात्यांनी त्यांचा दमदार आणि धमाकेदार लूक शेअर केला आहे. पोस्टरमध्ये ते गणवेश परिधान केलेल्या कॅप्टनच्या भूमिकेत डॅशिंग दिसत आहेत. अनिल कपूर त्यांच्या फिटनेससाठी ओळखले जातात. त्यामुळे ही भूमिका त्यांना चांगलीच शोभते.
टी-२० क्रिकेटचा नवा बॉस; ऑस्ट्रेलियाची दाणादाण उडवणारा रवी बिश्नोई
भारतीय क्रिकेट संघाने नुकतीच ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा ४-१ असा पराभव केला. या मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून ताजी क्रमवारी जाहीर झाली आहे. यात भारतीय खेळाडूांना टी-२० मालिकेतील कामगिरीचे मोठे बक्षीस मिळाले आहे.भारताचा युवा लेग स्पिनर रवी बिश्नोईने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या. आता भारताच्या या गोलंदाजाने टी-२० क्रमवारीत धमाका केला आहे. रवी बिश्नोई टी-२० क्रिकेटमधील अव्वल गोलंदाज झाला आहे. रवीने अफगाणिस्तानच्या राशिद खानला मागे टाकले. तिसऱ्या स्थानावर आदिल राशिद आणि वानिंदु हसरंगा तर महेश तिक्ष्णा पाचव्या स्थानावर आहे. भारताचा फिरकीपटू अक्षर पटेलने ११ स्थानांनी उडी घेत क्रमवारीत १६वे स्थान मिळवले आहे.
पाकव्याप्त काश्मीरसाठी जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत २४ जागा राखीव; लोकसभेत विधेयक मंजूर
लोकसभेत बोलत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठी घोषणा केली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधून विस्थापित झालेल्यांच्या कुटुंबाना प्रतिनिधित्व देण्यासाठी जम्मू-काश्मीर विधानसभेत एक जागा राखीव ठेवण्यात आली आहे. तसेच जम्मू-काश्मीरमधून विस्थापित झालेल्या नागरिकांसाठी दोन जागा राखीव ठेवल्या आहेत. तीन पैकी एका जागेवर महिला असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे पीओके हे आमचेच आहे, असे सांगत पाकव्याप्त काश्मीरसाठी जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत २४ जागा राखीव ठेवल्या आहेत. लोकसभेत “जम्मू-काश्मीर पुनर्गठन विधेयक” आणि “जम्मू-काश्मीर आरक्षण (सुधारणा) विधेयक” या दोन विधेयकांवर चर्चा झाल्यानंतर अमित शाह यांनी ही घोषणा केली.
गौतम अदाणी टॉप २० श्रीमंतांच्या यादीत सामील, एका आठवड्यात संपत्ती १० अब्ज डॉलरने वाढली
शेअर बाजारात सुरू असलेल्या तेजीच्या काळात अब्जाधीश उद्योगपती आणि अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात गौतम अदाणी यांच्या संपत्तीत १० अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, सध्या गौतम अदाणी यांची एकूण संपत्ती ७०.३ अब्ज डॉलर आहे.हिंडेनबर्गच्या अहवालानंतर झालेल्या नुकसानीमुळे गौतम अदाणी श्रीमंतांच्या टॉप २० यादीतून बाहेर होते, पण आता त्यांच्या संपत्तीच्या वाढीमुळे ते आता जगातील १५ वे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.