आज दि.५ डिसेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

“…तेव्हा कारवाई करू नका”, अमित शाहांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाला इशारा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्य प्रदेशातील निवडणुकीच्या प्रचारात ‘भाजपाला मत दिल्यास राम लल्लाचं मोफत दर्शन घडवू’ असं आश्वासन दिलं होतं. यावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे. याबाबत एक पत्रही त्यांनी निवडणूक आयोगाला लिहिलं आहे. धर्माच्या किंवा देवाच्या नावाने मतं मागितल्यास कारवाई होणार नसेल तर भविष्यात आमच्यावरही कारवाई करता कामा नये, अशा इशारा उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला दिला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, “निवडणूक प्रचारात देवाच्या नावाने किंवा धर्माच्या नावाने मतं मागितल्यावर तो गुन्हा होतो की नाही? याबाबत मी निवडणूक आयुक्तांना पत्र दिलं आहे. त्यात उदाहरणासह नमूद केलं आहे की, कर्नाटकच्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी ‘बजरंग बली की जय म्हणत मतपेटीचं बटन दाबा’ असं म्हणाले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेही मध्य प्रदेशाच्या निवडणुकीत ‘भाजपाला मत दिल्यानंतर आम्ही राम लल्लाचं दर्शन फुकट करून देऊ’, असं म्हणाले होते.”

‘सीआयडी’ फेम अभिनेते दिनेश फडणीस यांचे निधन, मृत्यूशी झुंज अपयशी

‘सीआयडी’ या एकेकाळच्या लोकप्रिय मालिकेत इन्स्पेक्टर फ्रेडरिक्स हे पात्र साकारणारे दिनेश फडणीस यांचं निधन झालं आहे. दिनेश यांची प्रकृती खालावल्याने मागच्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. या मालिकेत ‘दया’ हे पात्र साकारणाऱ्या दयानंद शेट्टीने दिनेश फडणीस यांच्या निधनाची माहिती दिली आहे.दिनेश फडणीस यांच्यावर मुंबईतील तुंगा रुग्णालयात १ डिसेंबरपासून त्यांच्यावर उपचार चालू होते. त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता, असं म्हटलं जात होतं, पण कालच दयानंद शेट्टीने हे वृत्त फेटाळलं होतं. त्यांचं लिव्हर डॅमेज असल्याचं त्याने सांगितलं होतं. त्यानंतर आता त्यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे.

मराठा आरक्षणाबाबतच्या क्युरेटिव्ह याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी

मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकार व इतरांनी सादर केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र संवर्ग करून आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून दिलेले आरक्षण वैध आहे की नाही, या मुद्द्यावर पाच सदस्यीय घटनापीठाकडून पुन्हा आढावा घेतला जाणार आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने ५ मे २०२१ रोजी मराठा आरक्षण रद्दबातल केले होते. मराठा समाज मागासलेला आहे, असे नमूद करून आरक्षणाची शिफारस करणारा न्या.एम. जे. गायकवाड यांचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने इंद्रा साहनी प्रकरणी घालून दिलेली ५० टक्के आरक्षणाची मर्यादा कोणतीही असाधारण किंवा अपवादात्मक परिस्थिती नसतानाही मराठा आरक्षण देेताना ओलांडली गेली, त्यामुळे मराठा आरक्षणाची तरतूद करणारा राज्य सरकारचा कायदा न्यायालयाने अवैध ठरविला होता.

एक लाख रुपये जवळ असूनही भिकाऱ्याचा भुकेमुळे मृत्यू

अनेकदा रस्त्यावर आपल्याला भिकारी भीक मागताना दिसतात. कुणाला अन्न हवं असतं, कुणाला त्या अन्नासाठी पैसे. गुजरातमधल्या एका भिकाऱ्याकडे भीक मागून जमलेले एक लाख रुपये होते. मात्र या भिकाऱ्याचा मृत्यू भुकेने तडफडून झाला. रविवारी वलसाड येथील सरकारी रुग्णालयात या भिकाऱ्याला दाखल करण्यात आलं तेव्हा त्याच्याकडे १ लाख रुपये होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही वेळातच या भिकाऱ्याचा मृत्यू झाला. या भिकाऱ्याच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं तेव्हा त्याचा मृत्यू भुकेमुळे झाल्याचं कारण समोर आलं.इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार वलसाडचे अधिकारी या प्रकरणी पुढील चौकशी करत आहेत. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार रविवारी एका दुकानदाराने आपत्कालीन क्रमांक १०८ डायल केला आणि गांधी वाचनालयाजवळच्या रस्त्याच्या बाजूला एक भिकारी आहे त्याची प्रकृती खालावली आहे असं सांगितलं. यानंतर भावेश पटेल आणि त्यांची टीम या ठिकाणी पोहचली. त्यांनी या वृद्धाची विचारपूस केली. प्राथमिक तपासणीनंतर या वृद्धाला उपचारांसाठी वलसाड येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे त्यांचा मृत्यू झाला.

इस्त्रोचं आणखी एक मोठं यश, चंद्राकडे पाठवलेलं यान पृथ्वीपर्यंत परत आणलं

सतत नवनवी यशाची शिखरं सर करणारी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने एक मोठं यश मिळवलं आहे. इस्रोने अलिकडेच भारताचं अवकाशयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवून मोठा पराक्रम गाजवला. यासह चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत जगातला पहिलाच देश ठरला. इस्रोची चांद्रयान-३ ही मोहीम यशस्वी ठरली. चांद्रयान-३ मधील प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडरने चंद्रावरील तापमानापासून ते पृष्ठभागाबाबतची माहिती इस्रोला दिली. तिथे काढलेले वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओदेखील इस्रोला पाठवले. परंतु, चंद्रावर रात्र झाल्यानंतर इस्रोचं चंद्रावरील संशोधनकार्य संपलं. दरम्यान, चांद्रयान मोहिमेच्या उत्तरार्धात इस्रोला आणखी एक यश मिळालं आहे.

“आमच्यातला संघर्ष संपला”, पंकजा मुंडेंचं नाव घेत धनंजय मुंडेंनी केलं जाहीर

बीड म्हटलं की मुंडे कुटुंब आणि दोन भावाबहिणींमधला राजकीय संघर्ष या दोन गोष्टी प्रामुख्याने चर्चेला येतात. पण आता पंकजा मुंडेंशी असलेला राजकीय संघर्ष संपला असल्याचं धनंजय मुंडेंनी जाहीर केलं आहे. त्यामुळे बीडमधील नागरिकांसाठी हा मुद्दा राजकीय चर्चेचा ठरला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या दोन्ही भावंडांमध्ये असणारा राजकीय वर्चस्वाचा वाद आता संपल्याचं खुद्द धनंजय मुंडेंनीच जाहीर केल्यामुळे आता दोघेही आगामी काळात एकत्र महायुतीचा प्रचार करताना दिसण्याची शक्यता आहे.

सोलापूर : बाल निरीक्षणगृहातील पाच मुलांचे अपहरण की पलायन ?

शाळेच्या निमित्ताने बाल निरीक्षण गृहाबाहेर गेलेल्या पाच मुलांना अज्ञात व्यक्तींनी कशाचे तरी आमीष दाखवून त्यांचे अपहरण केल्याची फिर्याद सोलापुरात सदर बझार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. लष्कर-उत्तर सदर बझार भागात १९३२ सालापासून कार्यरत असलेले ‘जिल्हा परिविक्षा आणि अनुरक्षण संघटना अभिक्षण गृह’ म्हणजेच बाल निरीक्षणगृह (रिमांड होम) हे येथे राहणाऱ्या मुलांचे जणू मायेचे संकुल मानले जाते. या बाल निरीक्षण गृहातून मुले पळूनही जातात. ही घटना पलायन की अपहरण या कात्रीत सापडलेली असली तरी पाच मुले एकाचवेळी बेपत्ता झाल्याने निरीक्षण गृहाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

ठरलं! ‘हा’ नेता होणार तेलंगणाचा नवा मुख्यमंत्री, सात डिसेंबरला शपथविधी, काँग्रेसची घोषणा

देशातल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. या पाचपैकी राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांची निवडणूक भाजपाने जिंकली आहे. तर तेलंगणा हे राज्य काँग्रेसने बीआरएसकडून हिसकावलं आहे. यासह मिझोरम विधानसभा निवडणुकीचा निकालही जाहीर झाला आहे. झोरम पिपल्स मूव्हमेंटने मिझोरममध्ये सत्ता मिळवली आहे. पाचपैकी एकमेव तेलंगणात काँग्रेसला बहुमत मिळालं आहे. त्यानंतर आता काँग्रेसकडून सरकार स्थापनेची तयारी सुरू झाली आहे. दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री कोण होणार हे देखील ठरलं आहे. रेवंत रेड्डी हे तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. सात डिसेंबर रोजी ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. काँग्रेस पक्ष कार्यालयाने रेवंत रेड्डी यांच्या नावाची घोषणा केली आहे.

राजपूत करणी सेनेच्या अध्यक्षांची हत्या, चार हल्लेखोरांनी घरात घुसून झाडल्या गोळ्या

राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळ्या झाडून हत्या झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. या घटनेमुळे जयपूर हादरलं आहे. हत्येची बातमी मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. हल्लेखोरांनी गोगामेडी यांच्या घरात घुसून त्यांची हत्या केली आहे. हल्लेखोरांनी गोगामेडींवर एकूण चार गोळ्या झाडल्या.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी संजू सॅमसनने केली दावेदारी पक्की

दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी विजय हजारे ट्रॉफीमध्ये संजू सॅमसनने दमदार कामगिरी केली होती. केरळकडून खेळताना त्याने रेल्वे संघाविरुद्ध १३९ चेंडूत १२८ धावांची नाबाद खेळी खेळली. मात्र, सॅमसनची ही खेळी व्यर्थ ठरली. आपल्या शतकी खेळीने केरळला तो विजयापर्यंत नेऊ शकला नाही आणि संघाला रेल्वेविरुद्ध १८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.रेल्वेसमोर २५५ धावांचा पाठलाग करताना संजू सॅमसनने केरळ संघासाठी कठीण काळात शतक झळकावले. १३९ चेंडूंचा सामना करताना सॅमसनने ६ षटकार आणि ८ चौकारांसह १३९ धावांची नाबाद खेळी खेळली. त्याने श्रेयस गोपालबरोबर चांगली भागीदारी केली, पण केरळ संघ ५० षटकात केवळ २३७/८ धावाच करू शकला. मात्र, संजू सॅमसनच्या या शानदार शतकी खेळीमुळे टीम इंडियात त्याची दावेदारी पक्की झाली आहे, असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात त्याला प्लेईंग-११मध्ये नक्कीच स्थान मिळू शकते.

भारत दाखवणार पाकिस्तानला आता आपली खरी ताकद

मोदी सरकार भारत-पाकिस्तान सीमेला लागूनच एक मोठा प्रकल्प उभारणार आहे. अदाणी ग्रुपची एक कंपनी त्यांना या कामात मदत करीत आहे. हा एक असा प्रकल्प असेल, ज्याच्या यशाचे संपूर्ण जग कौतुक करेल. आजपासून तीन वर्षांनंतर या भारतीय प्रकल्पाची चमक जगभर पाहायला मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या स्थापनेनंतर भारताने अक्षय ऊर्जा क्षेत्रात प्रचंड वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी स्थापन करण्यात भारताला यश आले आहे, जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ब्रेन चाइल्ड असल्याचं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आता भारत जगातील सर्वात मोठा अक्षय ऊर्जा प्रकल्प विकसित करीत आहे.गुजरातमधील कच्छचे खारट दलदलीचे वाळवंट भारत आणि पाकिस्तानला वेगळे करते. पण आता हे वाळवंट जगातील सर्वात मोठ्या अक्षय ऊर्जा प्रकल्पाचे साक्षीदार होणार आहे. तो प्रकल्प आतापासून येत्या ३ वर्षांत पूर्णपणे तयार होईल. येथे सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा प्रकल्प उभारले जाणार आहेत. ते अंतराळातून दिसू शकतील इतके मोठे असतील. शेजारच्या गावाच्या नावावरून ‘खावडा अक्षय ऊर्जा उद्यान’ असे नाव देण्यात आले आहे.

SD Social Media

9850603590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.