योगगुरू रामदेव बाबांनी ठाण्यात आयोजित योग शिबिरात महिलांच्या कपड्यांवरून वादग्रस्त विधान केलं. यानंतर त्यावर सडकून टीका होत आहे. माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार यशोमती ठाकुर यांनीही रामदेव बाबांच्या या वक्तव्यांवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. “रामदेव बाबांना भगवे कपडे परिधान करून असं घाणेरडं बोलण्याची परवानगी कोणीही दिलेली नाही,” असं मत यशोमती ठाकुर यांनी व्यक्त केली. त्या शुक्रवारी (२५ नोव्हेंबर) माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होत्या.
यशोमती ठाकुर म्हणाल्या, “रामदेव बाबांनी न शोभणारं वक्तव्य केलं आहे. एक व्यक्ती ज्याला योगगुरू मानलं जातं आणि जो भगवा परिधान करतो त्याने इतक्या खालच्या दर्जाचं वक्तव्य करणं अशोभनीय आणि निंदनीय आहे. देशात खूप सारे महत्त्वाचे विषय आहेत आणि त्यावर लक्ष देण्याची गरज आहे. केंद्र सरकार या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहे.”
“देशातील मुख्य प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी हे लोक अशी वक्तव्यं करत आहेत. आपण विचलित व्हावं हाच त्यांचा उद्देश आहे. भगवा परिधान करून असं घाणेरडं बोलण्याची परवानगी कोणीही दिलेली नाही. कोणताही धर्म हे मान्य करणार नाही,” असं मत यशोमती ठाकुर यांनी व्यक्त केलं.
रामदेव बाबा काय म्हणाले होते?
ठाण्यात हायलँड मैदानात आयोजित शिबिरात बोलताना बाबा रामदेव यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. ते म्हणाले, “महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात आणि काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात.”
यावेळी रामदेव बाबांबरोबर खासदार श्रीकांत शिंदे, अमृता फडणवीस, आमदार रवी राणा, दीपाली सय्यद उपस्थित होते. नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता.