नाशिकमध्ये सत्यजीत तांबे आणि सुधीर तांबे यांनी केलेल्या बंडामुळे काँग्रेस आणि महाविकासआघाडीवर मोठी नामुष्की ओढावली, यानंतर नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक चर्चेत आली. चर्चा नाशिकच्या निवडणुकीची असली तरी कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मात्र तगडी फाईट होण्याचं चित्र आहे, कारण महाविकासआघाडीला खिंडीत गाठण्यासाठी भाजपनेही फिल्डिंग लावली आहे.
कोकण शिक्षक मतदारसंघात भाजप युतीचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांचं महाविकासआघाडीच्या बाळाराम पाटील यांना कडवं आव्हान असणार आहे. राज्यात विधान परिषदेच्या एकूण पाच जागांसाठी निवडणूक होत आहे, त्यात कोकण शिक्षक मतदार संघाची निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. या निवडणुकीकरता शिंदे – फडणवीस सरकारने जोर लावलाय.
मुंबईतील पोट निवडणूकीनंतर आता विधान परीषद निवडणूकीकरता सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे, त्यात कोकण शिक्षक मतदार संघाची निवडणूक चांगलीच गाजत आहे, कारण शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार कोण असणार? याबाबत घडलेल्या सस्पेन्समुळे. या निवडणुकीत एकूण आठ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केलेत. मागच्या निवडणूकीच्या तुलनेत यंदा निवडणूक रिंगणात दोन उमेदवार कमी आहेत.
कोणत्याही पक्षाला अधिकृत उमेदवार न मिळाल्याने पक्षांनी आयाराम गयारामांच्या गळ्यात पक्षीय उमेदवारीची माळ घातली आहे. शेकापचे बाळाराम पाटील हे अपक्ष उमेदवार आहेत, महाविकास आघाडीला उमेदवारच न मिळाल्याने त्यांनी आता बाळाराम पाटील यांना पाठिंबा जाहीर केलाय.
आधी ठाकरे गटाकडे असलेले कोकण शिक्षक मतदार संघाचे शिक्षक सेनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे यांना महाविकास आघाडीने डावल्याने बंड केलं. भाजपाने त्यांना आधीच गळाला लावले होते, त्यानंतर आता भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने अधिकृत उमेदवार जाहीर केलंय. आश्चर्य म्हणजे ठाकरे शिक्षक संघटनेचा पाठिंबाही ज्ञानेश्वर म्हात्रे यांनाच असल्याचे बोललं जातंय.