आपल्या शानदार अभिनयातून लोकांच्या मनात स्थान मिळवणारे दिग्गज अभिनेते इरफान खान (Irrfan Khan) यांचा शेवटचा चित्रपट 4 वर्षांपासून प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. 2017 मध्ये या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाकडून कौतुकाची थाप मिळाली होती. इरफान खानने आपल्या 30 वर्षांच्या कारकीर्दीत तब्बल दोन डझनहून अधिक चित्रपट पुरस्कार जिंकले आहेत. गेल्या वर्षी 29 एप्रिलला इरफान खान यांचे कर्करोगाने निधन झाले होते.
इरफान खानचे वडील एक छोटे व्यापारी होते. इरफानच जन्म राजस्थानच्या टोंक शहरात 7 जानेवारी 1967 रोजी झाला होता. इरफान खानने टोंकमधील सुरुवातीचे शिक्षण संपवल्यानंतर त्यांना क्रिकेटचे वेड लागले होते. मीडिया रिपोर्टनुसार, इरफानची बीसीसीआयच्या प्रथम श्रेणी स्पर्धेच्या सीके नायडू ट्रॉफीसाठी अंडर-23 प्रकारात निवड झाली होती. तथापि, प्रवास आणि क्रिकेट किट इत्यादी खर्चीक बाबींमुळे त्यांनी या स्पर्धेत भाग घेतला नाही.
इरफान खान आपल्या थिएटर कलाकार काकासमवेत जोधपूरला गेले. येथूनच इरफानचे चित्रपटांमध्ये अभिनय करण्याचे स्वप्न वाढू लागले. त्यांनी जयपूर येथून मास्टर्स पूर्ण केले आणि 1984 मध्ये दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथे प्रवेश घेतला. चित्रपटांत काम करण्यासाठी दिल्लीहून मुंबईत दाखल झालेल्या इरफानला बराच संघर्ष करावा लागला. 1987 मध्ये मीरा नायर यांच्या ‘सलाम बॉम्बे’ या चित्रपटातून त्यांना अभिनयाची पहिली संधी मिळाली. सुरुवातीला लहान-लहान भूमिका साकारणाऱ्या इरफान खानने बॉलिवूड ते हॉलिवूडसह अनेक भाषांमध्ये शेकडो चित्रपट आणि अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले.
इरफान खान शेवट मोठ्या पडद्यावर 2020 मध्ये ‘इंग्लिश मीडियम’ या चित्रपटामध्ये करीना कपूर, दीपक डोब्रियाल यांच्यासह दिसला होता. मात्र, इरफान खानचा चित्रपट ‘द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स’ (The Song Of Scorpions) गेल्या 4 वर्षांपासून प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. या चित्रपटाचा प्रीमियर 2017 मध्ये स्वित्झर्लंडमधील लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवला गेला होता. जिथे त्याचे प्रचंड कौतुक झाले होते. चित्रपटाचे निर्माते अभिषेक पाठक आणि ज्ञान शर्मा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, इरफान खानचा हा शेवटचा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित होईल.