आपल्या हॉट अदांनी अभिनेत्री मल्लिका शेरावत हिने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख तयार केली. ‘मर्डर’ या चित्रपटातून ती रातोरात सुपरस्टार बनली. मल्लिकाचा हा चित्रपट 2004 मध्ये प्रदर्शित झाला होता. अभिनेता इमरान हाश्मीसोबत ती चित्रपटात झळकली होती. हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता जवळपास 17 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, इतक्या वर्षानंतर आता अभिनेत्रीने चित्रपटात तिने दिलेल्या बोल्ड दृश्यांविषयी आपले मत व्यक्त केले आहे.
अलीकडेच तिने दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, चित्रपटातील बोल्ड दृश्यांनंतर लोक तिच्या बद्दल काय विचार करू लागले होते. आता 17 वर्षानंतर अभिनेत्रीने असे म्हटले आहे की, या चित्रपटात बोल्ड सीन दिल्यावर लोकांनी जवळपास तिची नैतिक दृष्ट्या हत्याच केली होती.
मल्लिका शेरावत म्हणाली की, मर्डर फिल्म केल्यावर मला लोकांमध्ये एक खालच्या दर्जाची महिला म्हणून पाहिले गेले होते. जर आज मी या चित्रपटांबद्दल विचार केला तर, आता हे सगळं सामान्य झालं आहे. मात्र, त्यावेळी नव्हतं. कदाचित याचमुळे आता लोकांचा या चित्रपटाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. आता सिनेमा काळाबरोबर बदलत चालला आहे. सर्व प्रकारचे चित्रपट लोक पाहतात आणि पसंत देखील करतात.
मल्लिका आणि इमरान हाश्मीने ‘मर्डर’ या चित्रपटात अनेक चुंबन दृश्ये दिली होती. पण, एकदा इम्रान हाश्मीने कॉफी विथ करणमध्ये सांगितले होते की, मल्लिक शेरावत पडद्यावरील सर्वात वाईट ‘किसर’ आहे. या वक्तव्याने अभिनेत्रीला खूप वाईट वाटले होते आणि त्या अभिनेत्याला उत्तर देताना ती म्हणाले की, तिने ज्या सापाला कीस केले होते, तो इम्रान हाश्मीपेक्षा चांगला किसर होता. मात्र, ‘मर्डर’सारखा सुपरहिट चित्रपट दिल्यानंतरही हे दोन्ही स्टार पुन्हा कोणत्याही चित्रपटात एकत्र दिसले नाहीत.