आज दि.७ नोव्हेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या ‘पालखी मार्गाचे’ भूमीपूजन,11 हजार कोटींचे रस्ते

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी सोमवार, ८ नाोव्हेंबर रोजी पंढरपूर दौऱ्यावर आहेत.या दिवशी ते पालखी मार्गाच्या कामाचे भूमीपूजन करणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंव्दारे जनतेशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते या पालखी मार्गाचे व्हर्च्युअल भूमीपूजन होणार आहे. दिवेघाट ते मोहोळ हा संत ज्ञानेश्वार महाराज पालखीमार्ग 221 किमी, तर 130 किमी संत तुकाराम महाराज पालखी मार्ग हा पाटस ते तोंडले-बोंडले असा असणार आहे.

आषाढी वारीसाठी आळंदी व देहूमधून लाखो भाविक पंढरीच्या वाटेवर असतात. हा भक्तीचा सोहळा महाराष्ट्राचे वैभव असून श्रद्धेचा विषय आहे. लाखो भाविक ज्या मार्गावरून चालत येतात, तो रस्ता भव्य व सुंदर असावा या हेतूने नितीन गडकरी यांनी पालखी मार्गाचे विस्तारीकरण करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत दोन्ही रस्त्यांचे काम सुरू झाले आहे. उद्या या कामाचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते करण्यात येईल.

अनिल देशमुखांची रवानगी
१४ दिवसांच्या ईडी कोठडीत

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये सातत्याने वाढच होत आहे. ईडीच्या ७ नोटिसा आल्यानंतर अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात हजर होताच त्यांना अटक करण्यात आली. ईडीनं त्यांची कोठडी मागितली असूनही सत्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावत अनिल देशमुखांना शनिवारी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलं होतं. मात्र, यानंतर ईडीनं थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मुंबई उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द ठरवत अनिल देशमुखांची रवानगी १४ दिवसांच्या ईडी कोठडीत केली आहे.

अमोल कोल्हे यांनी घेतला एकांतवासात जाण्याचा निर्णय

अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी काही दिवसापूर्वी सोशल मीडिया वापरण्याबद्दल एक मोठा निर्णय घेतला होता. यानंतर त्यांनी दुसरा एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची माहिती त्यांनी इन्स्टा पोस्ट करत दिली आहे. मनाचा आणि शऱीराचा व मानसिक थकवा घालवण्यासाठी त्यांनी काही काळ एकांतवासात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

डॉ. अमोल कोल्हे यांनी इन्स्टा पोस्ट करत लिहिले आहे की, सिंहावलोकनाची वेळ:-गेल्या काही दिवसांत, महिन्यांत, वर्षांत बेभान होऊन धावत राहिलो, काही टोकाचे निर्णय घेतले, अनपेक्षित पावलंही उचलली. पण हे सगळं जुळवताना झालेली ओढाताण, तारेवरची कसरत, वेळेची गणितं, ताणतणाव यामुळे जरा थकवा आलाय..थोडा शारीरिक, बराचसा मानसिक! शारीरिक थकवा आरामाने निघून जाईल पण मानसिक थकवा घालवण्यासाठी हवं- थोडं मनन, थोडं चिंतन!

नवाब मलिक यांचा आरोप, खंडणीसाठी
आर्यन खानचे अपहरण केले

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत आर्यन खानचं अपहरण करून खंडणी उकळण्याचा हा सगळा डाव असल्याचा आरोप केला आहे. या अपहरण नाट्याचे मास्टरमाईंड मोहीत कंबोज असल्याचा दावा केला आहे. २ ऑक्टोबरच्या दिवशी क्रूजवर प्रतीक गाबा आणि आमिर फर्निचरवाला यांच्या माध्यमातून आर्यन खान क्रूजवर गेला. मोहीत कंबोज यांच्या साल्याच्या माध्यमातून हे जाळं टाकण्यात आलं. आर्यन खानचं अपहरण करून २५ कोटींची खंडणी मागण्याचा खेळ सुरू झाला. याची डील १८ कोटींमध्ये झाली. ५० लाख रुपये उचलले देखील गेले होते. पण एका सेल्फीने खेळ बिघडवला”, असं नवाब मलिक म्हणाले आहे.

अरबी समुद्रात वादळी वारे; मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा

अरबी समुद्रात निर्माण झालेलं हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र पुढील 12 तासांत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज आणि उद्या अरबी समुद्रात वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांना मासेमारी करण्यासाठी समुद्रात न जाण्याचा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. असं असलं तरी सुदैवाची बाब म्हणजे, अरबी समुद्रात निर्माण झालेलं कमी दाबाचं क्षेत्र भारतीय किनारपट्टीपासून दूर जात आहे. याचा महाराष्ट्राला कोणताही धोका नाही. पण आज काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी बरसणार आहेत.

पूर्व-मध्य अरबी समुद्रात निर्माण झालेलं हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र पुढील 12 तासांत आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आज अरबी समुद्रात 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तर उद्या वाऱ्यांचा वेग काहीसां मंदावणार असून उद्या 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार आहे. पुढील 48 तासात अरबी समुद्रात हवामाची हीच स्थिती कायम राहणार आहे. त्यानंतर हवेच्या कमी दाबाचा प्रभाव हळुहळू कमी होण्याची शक्यता आहे.

खंडणीच्या वसुलीचे वाटेकरी
कोण कोण होते : राम कदम

भाजपा आमदार राम कदम यांनी टीका केली आहे. राम कदम म्हणाले, “ड्रग्ज प्रकरणात दररोज पत्रकारपरिषद घेणारे, महाराष्ट्र सरकारचे मंत्री आज स्पष्टपणे बॅकफूटवर दिसले, काय कारण? जेव्हा राष्ट्रवादी नेते सुनील पाटील हे प्रकरणात सूत्रधार असुन, त्यांचा माणूस किरण गोसावी त्याच्याद्वारे शाहरुख खानकडून २५ कोटी रुपयांची वसुली करत होते. हे जेव्हा समोर आलं आणि मग या वसुलीचे वाटेकरी कोण? नेते कोण? मंत्री कोण? हे सगळं पुढे आलं तर पंचायत होईल. यामुळे ते बॅकफूटवर होते का? नेमकं कारण काय? एनसीबीला बदनाम केलं. काही कारण नसताना भाजपालाही ओढण्याचा प्रयत्न केला.

मलिक यांचे सर्व आरोप
बिनबुडाचे : मोहित कम्बोज

मोहित कम्बोज यांनी या आरोपांना प्रत्तुत्तर दिले आहे. नवाब मलिक यांनी ज्या हॉटेल व्यवसायाचा उल्लेख केला आहे तो माझा नाही. त्यांचे आरोप खोटे आहेत. ते दुसऱ्यांचे व्यवसाय माझे असल्याचे सांगत आहेत. मी २०१४ साली निवडणूक लढलो. ३५० कोटींची संपत्ती असल्याचे मी स्वतः सांगितले. मी कोणता घोटाळा केला आहे याची माहिती घेऊन या. मी वर्षाला पाच कोटींचा कर भरतो. मी मलिक आणि त्यांच्या मुलांप्रमाणे काही लपवत नाही. हे आरोप करुन माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. मी तुम्हाला घाबरत नाही,” असे मोहित कम्बोज म्हणाले.

तर नेत्यांना सांगा मत ट्विटरच
देईल : योगी आदित्यनाथ

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांवर सडकून टीका केलीय. आम्ही करोना काळात जनतेची सेवा करत असताना इतर पक्षांचे लोक गृहविलगीकरणात होते असा आरोप आदित्यनाथ यांनी केला. तसेच तुमच्या संकटाच्यावेळी घरात घुसून बसलेल्या आणि केवळ ट्विटरवर दिसणाऱ्या नेत्यांना मतं देखील ट्विटरच देईल असं सांगा, असं आवाहन आदित्यनाथ यांनी केलं. ते उत्तर प्रदेशमधील इटवाह येथील एका सभेत बोलत होते.

मुंबई हल्ल्यासाठी जबाबदार हाफिज सईदला
लाहोर न्यायालयाने केले निर्दोष मुक्त

लाहोर उच्च न्यायालयाने हाफिज सईदसह जमात-उद-दावाच्या सहा नेत्यांना दहशतवादाला अर्थसहाय्य केल्याप्रकरणी निर्दोष मुक्त केले आहे. तसेच न्यायालयाने शनिवारी ट्रायल कोर्टाने या सहा जणांना सुनावलेली शिक्षा देखील रद्द केली आहे. यासंदर्भात पाकिस्तान मीडियाच्या हवाल्याने एएनआयने वृत्त दिलंय. सईदच्या नेतृत्वाखालील जमात-उद-दावा ही प्रतिबंधित दहशतवादी संघटना आहे. जमात-उद-दावा ही संघटना २००८च्या मुंबई हल्ल्यासाठी जबाबदार असून या हल्ल्यात सहा अमेरिकी लोकांसह १६६ लोक मारले गेले होते.

विनापरवानगी हात पंपाचा वापर,
मारहाणीत वृद्धाचा मृत्यू

एका वृद्धाने विनापरवानगी हँडपम्प वापरल्यामुळे त्याला मारहाण करण्यात आली. या मारहाणीत वृद्धाचा मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील सालेमपूर गावात घडली. या वृद्धाला हँडपम्प मालकांनी मारहाण केली. मृताने तहान लागल्याने विनापरवानगी हँडपम्पावरून पाणी प्यायले होते. या कारणावरून आरोपींनी वृद्धाला मारहाण केली.

सुपर १२ क्वालिफायर्समध्ये
भारतीय संघाचा समावेश

ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२२ साठी थेट सुपर १२ क्वालिफायर्समध्ये प्रवेश करण्याऱ्या आठ संघांची आयसीसीने घोषणा केली आहे. या आठ संघांमध्ये यजमान ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड, पाकिस्तान, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान आणि बांगलादेशचा समावेश आहे. सध्याच्या विश्वचषकात फायनल खेळणाऱ्या दोन संघांव्यतिरिक्त, आयसीसी क्रमवारीतील सहा सर्वोत्तम संघांना १५ नोव्हेंबरपर्यंत थेट सुपर १२ मध्ये प्रवेश मिळेल. सुपर १२ मध्ये रँकिंगनुसार क्वालिफाय करण्याची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर आहे.

Google ‘या’ विद्यार्थिनींना देणार तब्बल 70,000 रुपये स्कॉलरशिप

कॉम्प्युटर सायन्समध्ये करिअर करणार्‍या किंवा ध्येय ठेवणार्‍या महिलांना Google शिष्यवृत्ती देत आहे. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आशिया-पॅसिफिकमधील महिलांसाठी खुली आहे, त्यामुळे भारतीय विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात.

जनरेशन गुगल स्कॉलरशिप फॉर वुमन इन कॉम्प्युटर सायन्स ही विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानात संगणक विज्ञान पदवी मिळविण्यासाठी मदत करते. निवडलेल्या विद्यार्थ्यांना 2022-2023 शालेय वर्षासाठी $1000 (रु.74191.35) ची शिष्यवृत्ती मिळेल.

रामायण एक्सप्रेस
आज पासून धावणार

IRCTC ने रामायण यात्रेची योजना तयार केलीय. या यात्रेमुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे. त्याचबरोबर कोविड 19 निर्माण झालेली स्थिती सुधारण्यासही मदत होणार आहे. सरकारने त्यासाठी रामायण सर्किटवर काम सुरु केलं आहे. या सर्व स्थळांवर रेल्वेद्वारे यात्रा करता येऊ शकणार आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अॕन्ड टुरिझम कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार सात नोव्हेंबरपासून या यात्रेला राजधानी दिल्लीवरुन सुरुवात होणार आहे.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.