डॉक्टरांची खिल्ली उडवणं आणि अँलिओपॅथी उपचारांवर टीका करणं योग गुरु रामदेव बाबांना चांगलंच भोवताना दिसत आहे. आयएमए उत्तराखंडने रामदेव बाबांना एक हजार कोटींच्या अब्रु नुकसानीच्या दाव्याची नोटीस बजावली आहे. 15 दिवसाच्या आत माफी मागा नाही, तर कारवाईला सामोरे जा, असा इशारा या नोटीशीतून रामदेव बाबांना देण्यात आला आहे. तसेच रामदेव बाबांवर एफआयआर दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
रामदेव बाबांनी 15 दिवसात त्या व्हिडीओतील मतावर खुलासा करावा. तसेच लेखी माफी मागावी. तसे न केल्यास त्यांच्याविरोधात 1 हजार कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा करण्यात येईल, असं या नोटीशीत म्हटलं आहे. त्या शिवाय येत्या 72 तासात कोरोनिल किटच्या फसव्या जाहिराती सर्व ठिकाणाहून हटवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. कोव्हिड व्हॅक्सिन घेतल्यानंतर होणाऱ्या साईड इफेक्टवर कोरोनिल प्रभावी असल्याचा दावा रामदेव बाबांनी केला होता.
रामदेव बाबांनी त्यांच्या वक्तव्याचे व्हिडीओ आणि पोस्ट सोशल मीडियातून तात्काळ हटवावेत. तसं न केल्यास त्यांच्यावर एक हजार कोटींचा दावा करण्यात येईल. आयएमएने रामदेव बाबांना ही सहा पानी नोटीस बजावली असून त्यात हा इशारा देण्यात आला आहे.
रामदेव बाबांच्या या वक्तव्याने आयएमए उत्तराखंडच्या दोन हजार सदस्यांचा अपमान झाला आहे. त्यामुळे प्रत्येक डॉक्टरांच्या मानहानीपोटी प्रत्येकी 50 लाख असे एक हजार कोटी रुपयांच्या मानहानीचा आम्ही दावा करणार आहोत. तसेच बाबा रामदेव विरोधात आम्ही एफआयआरही दाखल करणार आहोत, असं या नोटीशीत म्हटलं आहे.
कोरोना व्हॅक्सिनच्या दुष्परिणामापासून कोरोनिल बचाव करत असल्याचा दावा रामदेव बाबा करत आहेत. अशा प्रकारच्या जाहिरातींमुळे डॉक्टरांचं मनोबल खच्चीकरण केलं जात आहे. त्यामुळे त्यांनी ही जाहिरात मागे घ्यावी. नाही तर आम्ही त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहोत, असं एका डॉक्टराने सांगितलं.