मालेगाव शहर आणि तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येत घट होत असताना म्युकरमायकोसिसचा कहर वाढत आहे मालेगाव शहर आणि परिसरात म्युकरमायकोसिसचे 50 पेक्षा जास्त संशयित रुग्ण असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यापैकी तिघा जणांना प्राण गमवावे लागले आहेत.
मालेगाव सामान्य रुग्णालयात आतापर्यंत सात रुग्ण दाखल झाले असून शहरातील एक आणि ग्रामीण भागातील दोन अशा तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दोघांवर मालेगावात उपचार सुरु आहेत. सुदैवाने एक रुग्ण पूर्णपणे बरा होऊन घरी परतला आहे. मालेगाव शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आणि मृत्यूची संख्या सध्या कमी असली तरी त्या तुलनेत म्युकरमायकोसिसचे आढळून येणारे रुग्ण ही गंभीर बाब असल्याचे नेत्ररोग, दंतरोगतज्ज्ञांनी सांगितले आहे.
दरम्यान, म्युकरमायकोसिस रुग्णांची संख्या वाढल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधून उर्वरित रुग्णांची माहिती घेण्याचे काम महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने सुरु करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी येथील शासकीय विश्रामगृहावर म्युकरमायकोसिस या आजाराची वाढती रुग्णसंख्या पाहून तातडीने आढावा बैठक घेत विविध उपाययोजना आणि जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
म्युकरमायकोसिस हे एक फंगल इन्फेक्शन आहे, जे कोरोना विषाणूमुळे उद्भवते. हा संसर्ग सामान्यत: नाकातून सुरू होतो. जे हळूहळू डोळ्यांपर्यंत पसरतो. म्हणूनच, संक्रमण होताच त्यावर उपचार करणे फार महत्वाचे आहे.
इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या म्हणण्यानुसार, कोरोना रूग्णांमध्ये केवळ काही विशिष्ट परिस्थितीत म्युकरमायकोसिस होण्याचा धोका वाढतो. अनियंत्रित मधुमेह, स्टिरॉइड्समुळे प्रतिकारशक्ती कमकुवत होणे, दीर्घकाळ आयसीयू किंवा हॉस्पिटलमध्ये अॅडमिट राहणे, इतर कोणताही रोग, पोस्ट प्रत्यारोपण (ऑर्गेन ट्रान्सप्लांट) किंवा कर्करोग झाल्यास काळ्या बुरशीचा धोका वाढू शकतो.
काळ्या बुरशीमध्ये बर्याच प्रकारची लक्षणे दिसतात. डोळे लाल होणं किंवा डोळे आणि आसपास वेदना होणे, ताप, डोकेदुखी, खोकला, श्वास घेताना त्रास होणे, उलट्या होणे आणि त्यावाटे रक्त पडणं किंवा मानसिक स्थितीत बदल होणे ही काळ्या बुरशीची प्रमुख लक्षणे आहेत.
काळ्या बुरशीपासून बचाव करण्यासाठी धुळीच्या ठिकाणी मास्क घाला. माती किंवा खत यांसारख्या गोष्टींच्या संपर्कात येत असाल तर शूज, ग्लोव्हज, फुल स्लीव्ह शर्ट आणि ट्राऊझर घाला. स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. मधुमेहावर नियंत्रण मिळवा, इम्यूनोमोड्युलेटिंग औषधे किंवा स्टिरॉइड्सचा वापर टाळा.