औरंगजेबाच्या वंशजाच्या पोस्टरवरून कोल्हापुरात चांगलाच राडा झाला. बिर्याणी हॉटेलमध्ये बहादूर शाह जफरचं लावलेलं पोस्टर तरूणांनी फाडून टाकलं. औरंगजेबाचं पोस्टर हॉटेलमध्ये लावण्यात आल्याचा मेसेज सोशल मीडियात व्हायरल झाला होता. त्यानंतर हिंदुत्ववाद्यांनी हॉटेलवर हल्लाबोल केला.
संतप्त तरूणांकडून बहादूर शाह जफरच्या पोस्टरची मोडतोड करण्यात आली. यावेळी हॉटेलमधील कर्मचारी आणि आणि तरूणांमध्ये बाचाबाची झाली. बिर्याणी बाय किलो या बिर्याणी हॉटेलमध्ये हा राडा झाला. या राड्याचं मूळ होतं ते सोशल मीडियातल्या एका व्हायरल मेसेजमध्ये. हॉटेलमध्ये औरंगजेबाचं पोस्टर लावण्यात आल्याचा मेसेज व्हायरल झाला होता. औरंगजेबाचं उदात्तीकरण सुरू असल्याचं कळाल्यानंतर संतप्त तरूण हॉटेलवर धडकले. मात्र, लावण्यात आलेलं पोस्टर औरंगजेबाचं नसून शेवटचा मुघल सम्राट तसेच उर्दू कवी बहादूर शाह जफरचं होतं, अशी माहिती समोर आलीय. मात्र, एका मुघलाचा फोटो हॉटेलमध्ये लावण्यात आल्याचा समज करून तिथं तोडफोड करण्यात आली. औरंगजेबाचं उदात्तीकरण खपवून घेतलं जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला.
मुघल साम्राज्यानं महाराष्ट्रावर अनेक आक्रमणं केली. मुघल सम्राट औरंगजेब मराठ्यांचं राज्य बुडवण्यासाठी महाराष्ट्रात ठाण मांडून बसला होता. छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या औरंगजेबानं केली होती. त्यामुळे औरंगजेब, मुघल साम्राज्याविषयी देशभरात आणि जास्त करून महाराष्ट्रात प्रचंड संताप पाहायला मिळतो. त्यामुळेच औरंगजेबाचा वंशज असलेला मुघल सम्राट बहादूर शाह जफरच्या पोस्टरला औरंगजेब समजून हॉटेलवर हल्लाबोल करण्यात आला. औरंगजेबच काय तर कोणत्याही मुघल सम्राटाचा महाराष्ट्रात उदोउदो सहन केला जाणार नाही, असा इशाराही या कार्यकर्त्यांनी दिला.