‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेच्या विजेत्याला यंदा देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते दिली जाणार ‘मानाची गदा’
राज्याच्या कुस्ती विश्वातील अत्यंत प्रतिष्ठेच्या असणाऱ्या ६५ व्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचे आयोजन ११ ते १५ जानेवारी २०२३ दरम्यान पुण्यात करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या आयोजनाचा मान संस्कृती प्रतिष्ठानला मिळालेला आहे. तर आता या स्पर्धेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रण देण्यात आले आहे. अंतिम सामान्यास फडणवीस उपस्थित राहणार असून, त्यांच्या हस्ते मानाचा किताब प्रदान केला जाणार आहे. अशी माहिती संयोजक आणि पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
“नरभक्षक वाघांना त्वरीत जेरबंद करा, अन्यथा निलंबनाची कारवाई”, वनमंत्री मुनगंटीवारांचा अधिकाऱ्यांना इशारा
चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यात सातत्याने जाणारे बळी ही अतिशय चिंतेची बाब आहे. या नरभक्षक वाघांना त्वरीत जेरबंद करावे, अन्यथा निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना दिला.
१४ डिसेंबर रोजी मुल तालुक्यातील कांतापेठ येथे देवराव सोपनकार, सावली तालुक्यात बाबुराव कांबळे व १५ डिसेंबर रोजी खेडी येथे स्वरूपा येलट्टीवार यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. त्याआधी ७ डिसेंबर रोजी पेटगाव येथेही वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला.
त्या 19 बंगल्यांची चौकशी सुरू, हिवाळी अधिवेशनात नागपूर तापणार; सरकार ठाकरेंना घेरणार!
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ठाकरे कुटुंबाच्या नावे रायगड जिल्ह्यातल्या कोर्लेईत असलेल्या कथित बंगल्याचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत किरीट सोमय्या या प्रकरणी याचा पाठपुरावा करत होते. पण आता या प्रकरणात ग्रामविकास खात्याची एंट्री झालीय. ग्रामविकास खात्यानं कोर्लेईतल्या बंगल्यांची चौकशी सुरु केलीय. दोन दिवस या प्रकरणाचा चौकशी अहवालही मागवलाय. आणि मुख्य म्हणजे अवघ्या चार दिवसांवर विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आहे, त्यामुळे अधिवेशनात सत्ताधारी या बंगल्यांचा मुद्दा उपस्थित करुन विधिमंडळ अधिवेशन गाजवण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरेंच्या परिवाराचे रायगडमध्ये 19 बंगले असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केलाय. या प्रकरणी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी 48 तासात या प्रकरणी चौकशी अहवाल पूर्ण करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती सोमय्यांनी दिली आहे.
भाषा सल्लागार समिती सदस्यपदाचा डॉ. सुहास पळशीकर यांचा राजीनामा
राज्यशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सुहास पळशीकर यांनी भाषा सल्लागार समिती सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे.राज्य शासन जे साहित्यविषयक पुरस्कार देते त्यापैकी एका जाहीर झालेल्या पुरस्काराचा निर्णय अलीकडेच शासनाने रद्द केला आहे. ही बाब मला अनुचित वाटते. शासनाच्या तज्ज्ञ समित्या आणि अभ्यास गट यांना स्वायत्तता नसेल तर अशा यंत्रणांच्या मार्फत चांगले काम होणे अवघड आहे असे मला वाटते. अनुवादासाठी पुरस्कार मिळालेल्या पुस्तकाचा पुरस्कार केवळ ऐकीव माहिती आणि पूर्वग्रह यांच्या आधारे शासनाने रद्द करणे ही घटना म्हणजे शासन वैचारिक स्वातंत्र्य आणि मतभिन्नता यांचा आदर करीत नाही याचा संकेत आहे, अशी भूमिका स्पष्ट करून पळशीकर यांनी भाषा सल्लागार समिती सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे.
रेल्वेवर दगडफेक करणाऱ्या आरोपीला १७ वर्षांनी सुप्रीम कोर्टाकडून जामीन
गुजरातमधील जातीय दंगलींना कारणीभूत ठरलेल्या फेब्रुवारी २००२ च्या गोध्रा रेल्वे जळीतकांड प्रकरणातील ३१ दोषींपैकी एक असले्लया फारुखला सर्वोच्च न्यायालयाने अखेर आज(गुरुवार) जामीन मंजूर केला आहे.
गोध्रा हत्याकांड प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या फारुखला सर्वोच्च न्यायालायाने हा विचार करून जामीन मंजूर केला, की त्याने आधीच १७ वर्षे शिक्षा भोगली आहे आणि रेल्वेवर दगडफेक करणाऱ्यांमध्ये तो होता.
मोदींचे विश्वासू सी. आर. पाटील नेमके आहेत कोण ?
गुजरात विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या ऐतिहासिक यशाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत रघुनाथ पाटील म्हणजे सी. आर. पाटील यांना दिले. पाटील यांचे संघटना मजबुतीचे ‘गुजरात प्रारुप’ राज्या-राज्यांत वापरले गेले तर तिथेही भाजपला यश मिळणे अवघड नाही, असे कौतुकोद्गार मोदींनी भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत काढले. दक्षिण गुजरातमधील नवसारीच्या या मितभाषी खासदाराने २०१९च्या लोकसभा निवडणुकीत ‘पन्ना समिती’चा प्रयोग यशस्वी करून दाखवला होता. यावेळी, २०२२ मध्ये विधानसभा निवडणुकीतही पन्ना समित्यांनी भाजपची संघटना मजबूत केली आणि १८२ पैकी १५६ जागा जिंकून दिल्या.
छत्रपती संभाजीराजेंच्या राज्याभिषेकाचा उल्लेखच नाही, अखेर कालनिर्णयचं स्पष्टीकरण
छत्रपती संभाजीराजे यांच्या राज्याभिषेकाची तारीख न छापल्याने कालनिर्णय दिनदर्शिकेवर बहिष्कार टाकण्याची मागणी सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून होत आहे. आता यावर कालनिर्णयकडून प्रतिक्रिया देण्यात आली असून राज्याभिषेक दिनाचा उल्लेख राहून गेल्याचं म्हटलं आहे. तसंच यापुढील सर्व आवृत्त्यांमध्ये हा उल्लेख केला जाईल असंही सांगण्यात आलं आहे.
संभाजीराजेंचा राज्याभिषेक 16 जानेवारी 1681 रोजी झाला होता. तारखेनुसार छत्रपती संभाजीराजेंच्या राज्याभिषेकाची नोंद कालनिर्णयच्या 2023 च्या दिनदर्शिकेत नसल्यानं याविरोधात अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट्स केल्या होत्या. छत्रपती संभाजीराजेंच्या राज्याभिषेकाची माहिती न देणारी दिनदर्शिका घेऊ नये असं युजर्सनी म्हटलं होतं.
समृद्धी महामार्गावर कारला भीषण आग, कार जळून खाक
नागपूर आणि मुंबईला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. समृद्धी महामार्ग सुरुवातीपासून अनेक कारणांनी चर्चेत आहे. दरम्यान, समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाल्यापासून अपघातासह विविध कारणांमुळे त्याची चर्चा होत आहे. आता समृद्धी महामार्गावर कारला आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये कार जळून खाक झालीय.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, वैजापूर जवळ असलेल्या गलांडे वस्तीजवळ समृद्धी महामार्गावर कारला भीषण आग लागली. या आगीमध्ये कार जळून खाक झालीय. कारला लागलेल्या आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. सुदैवाने कारला लागलेल्या आगीत कोणतीही जिवित हानी झालेली नाही. कार पुण्यातील नितीन राजपूत यांची असल्याची माहिती मिळाली आहे.
भारताला एका चेंडूवर चौकार न लावता मिळाल्या सात धावा
भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना चितगाव येथे खेळला जात आहे. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना ४०४ धावा केल्या. संघाने २९३ धावांवर ७ गडी गमावल्या होत्या. मात्र यानंतर कुलदीप यादव आणि रविचंद्रन अश्विन या दोघांनी खेळपट्टीवर पाय रोवून भारताला चारशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. त्या दोघांमध्ये ८७ धावांची भागीदारी झाली होती. ही भागीदारी ८२ धावांची झाली असती पण बांगलादेशच्या क्षेत्ररक्षकाकडून एक खूप मोठी अनवधानाने चूक झाली आणि त्याचा फायदा भारताला अतिरिक्त ५ धावांच्या स्वरुपात मिळाला.
मांजराला त्रास देणं पडलं महागात, ब्राझील फुटबॉल कन्फेडरेशनला 1.56 कोटींचा दंड
ब्राझील फुटबॉल कन्फेडरेशनला 1 कोटी 65 लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. मांजराला त्रास दिल्यानं ही दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. ब्राझीलच्या संघांचे राष्ट्रीय प्रेस अधिकारी विनिसियस रोड्रिगेज यांनी एका मांजराशी क्रूरपणे वागल्यानं एनजीओंच्या एका गटाने आणि देशातील प्राण्यांच्या संरक्षणासाठी असलेल्या राष्ट्रीय फोरमने ब्राझील फुटबॉल कन्फेडरेशनविरुद्ध 1 मिलियन रीसचा दावा दाखल केला होता. अर्जेंटिनातील वृत्तपत्र एल ग्राफिकोने बुधवारी दिलेल्या वृत्तानुसार 7 डिसेंबरला रोड्रिगेज यांनी ब्राझील संघासाठी एका पत्रकार परिषदेवेळी मांजराला उचलून टेबलवरून फेकलं होतं. याप्रकरणी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.
SD Social Media
9850 60 3590