थिओ हर्नांडेझ आणि रॅण्डल कोलो मौनी या दोघांनी केलेल्या गोल्सच्या जीवावर फ्रान्सने फिफा विश्वचषक २०२२ च्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. मोरक्कोचा बचाव भेदण्यात फ्रान्सला पाचव्या मिनिटालाच यश आलं. यानंतर मोरक्कोला सामन्यात पुनरागमन करताच आलं नाही. फ्रान्सने सलग दुसऱ्यांदा विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. विद्यमान विश्ववेजता असलेला हा संघ आता अर्जेंटिनाविरुद्ध अंतिम सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे. दोन वेळा विश्वविजेत्या ठरलेल्या अर्जेंटिनाचा संघ लिओन मेस्सीच्या नेतृत्वाखाली जिंकणार की फ्रान्स आपली मत्तेदारी कायम राखणार हे अंतिम सामन्यामध्येच पाहायला मिळेल.
फ्रान्सने पाचव्या मिनिटापासूनच आक्रमक खेळ सुरु केला. अँटोइन ग्रिजमनने काइलियन एमबाप्पेला केले पास एमबाप्पेने डाव्या पायाने गोलपोस्टवर धाडला मात्र हा गोल वाचवण्यात मोरक्कोला यश आलं. त्याच मिनिटाला थिओ हर्नांडेझने सहा यार्ड बॉक्समधून मारलेला चेंडू नेटच्या डाव्या कॉर्नरमध्ये जाऊन विसावला आणि २०१८ च्या विश्वविजेत्या संघास १-० ची आघाडी मिळाली. मोरक्कोनेही अनेकदा प्रयत्न केले मात्र त्यांना यश आलं नाही. नासेर मजरावीने अझेदिन ओनाहीला केलेला पास नेटच्या उजव्या बाजूच्या खालच्या कोपऱ्यात जाण्याआधीच अडवण्यात आला.
११ व्या मिनिटाला अँटोइन ग्रिजमनने गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळेसच काइलियन एमबाप्पेसाठी ऑफसाईडचा झेंडा पंचांनी वर केला. सामन्यातील ७९ व्या मिनिटाला फ्रान्सने दुसरा गोल केला. इंजरी टाइममध्ये मोरक्कोने वेगवान खेळ करत २-० ची आघाडी कमी करण्यासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र फ्रान्सपुढे त्यांचा निभाव लागला नाही. आता फ्रान्स मेस्सीच्या संघाविरोधात जेतेपदासाठी मैदानात उतरणार आहे.
फ्रान्सकडे केवळ ३९ टक्के वेळ चेंडू होता. बॉल पजेझनच्या बाबतीत मोरक्कोकडे चेंडू असण्याचं प्रमाण ६१ टक्के इतकं राहिलं. दोघांनीही समसमान पोस्ट ऑन गोल म्हणजेच गोल करण्याचे प्रयत्न केले.