देशात दहा ते १७ वर्षे वयोगटातील एक कोटी ५८ लाख मुलांना विविध प्रकारचे व्यसन असल्याची धक्कादायक माहिती केंद्र सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयास दिली.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या संदर्भात केलेल्या सर्वेक्षणातील आकडेवारीचा संदर्भ घेऊन केंद्राने आहे, की भारतीयांकडून उत्तेजना व नशेसाठी ‘अल्कोहोल’ हा सर्वाधिक वापरला जाणारा घटक आहे. त्याखालोखाल गांजा-भांग व अफू वापरली जाते. सुमारे १६ कोटी नागरिक मद्याद्वारे अल्कोहोलचे सेवन करतात. पाच कोटी सात लाखांहून अधिक व्यक्ती अल्कोहोलच्या आहारी गेले असून, त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी त्यांना तातडीने मदतीची आवश्यकता आहे. तीन कोटी एक लाख व्यक्ती गांजा किंवा त्यापासून बनवलेले अमली पदार्थाचे व्यसन करतात. त्यापैकी सुमारे २५ लाख व्यक्तींच्या तब्येतीवर या व्यसनाचे दुष्परिणाम होतात. सुमारे दोन कोटी २६ लाख नागरिक अफूचे सेवन करतात. त्यामुळे झालेल्या आरोग्याच्या प्रश्नांमुळे ७७ लाखांना वैद्यकीय मदतीची गरज भासते.
केंद्राची बाजू मांडणाऱ्या अतिरिक्त महान्याय अभिकर्ता ऐश्वर्या भाटी यांनी न्यायमूर्ती के. एम. जोसेफ आणि बी. व्ही. नागरथना यांच्या खंडपीठाला सांगितले, की सर्वोच्च न्यायालयाच्या २०१६ च्या निकालानंतर, सरकारने देशांत अंमली पदार्थाच्या वापराची व्याप्ती आणि अमली पदार्थाच्या प्रकाराच्या वापराची माहिती घेण्यासाठी देशव्यापी सर्वेक्षण केले. सर्वोच्च न्यायालयाने १४ डिसेंबर २०१६ रोजी दिलेल्या आदेशाचे पालन करून सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालयाने नशेसाठी विविध पदार्थाच्या वापराची राष्ट्रीय स्तरावरील माहिती व आकडेवारी मिळवण्यासाठी प्रथमच राष्ट्रीय सर्वेक्षण केले. बचपन बचाओ आंदोलन या स्वयंसेवी संघटनेची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील एच. एस. फुलका यांनी युक्तिवाद केला होता, की सरकार २०१६ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे पालन करत नाही आणि अमली पदार्थाच्या गैरवापर रोखण्यासाठी आपल्या राष्ट्रीय योजनेत सर्व पैलूंचा समावेश केलेला नाही.
अहवाल काय सांगतो?
* नशा करण्यासाठी भारतीय तरुण सामान्यपण अल्कोहोलचा वापर करतात. एकूण लोकसंख्येपैकी १४.६ टक्के नागरिक (१० ते ७५ वयोगट) मद्यप्राशन करतात. म्हणजेच १६ कोटी नागरिक मद्याचे सेवन करतात.
* महिलांच्या तुलनेने अधिक पुरुष मद्यसेवन करतात. १.६ टक्के महिला तर २७.३ टक्के पुरुष मद्यसेवन करतात.
* छत्तीसगढ, त्रिपुरा, पंजाब, अरुणाचल प्रदेश आणि गोवा या राज्यांमध्ये सर्वाधिक मद्यप्राशन केले जाते.
* मद्यसेवनामध्ये ३० टक्के नागरिक देशी दारूचे सेवन करतात, तर ३० टक्के नागरिक भारतीय बनावटीच्या परदेशी मद्याचे सेवन करतात.