टी-20 विश्वचषकातील विजयाची नशा पाकिस्तानातील प्रत्येक सामान्य आणि खास व्यक्तींच्या डोक्यावर चढली आहे. जनता वेगवेगळ्या पद्धतीनं आपला आनंद व्यक्त करत आहे. तर, मंत्री मुंगी काहीही विधानं करत आहेत. आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही असंच वक्तव्य केलं आहे. यावरून हा विजय पाकिस्तानींसाठी किती महत्त्वाचा आहे, हे दिसून येतं.
पाकिस्तानच्या SammaTVच्या वृत्तानुसार, पंतप्रधान इम्रान खान यांनी सौदी अरेबियामध्ये बोलताना भारताशी संबंध सुधारण्याची गरज असल्याचं सांगितले. मात्र, या संवादासाठी ही वेळ योग्य नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. त्यामागे इम्रान खान यांनी रविवारी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्याच्या निकालाचं कारण दिलं.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान रियाधमध्ये पाकिस्तान-सौदी इनव्हेस्टमेंट फोरमला संबोधित करत होते. यादरम्यान, ते म्हणाले की रविवारी रात्री भारताच्या T20 विश्वचषकातील पराभवानंतर शेजारी देशाशी संबंध सुधारण्याबद्दल बोलण्यासाठी ही ‘उत्तम वेळ’ नाही. भारतासोबतचे संबंध सुधारले तर ते दोन्ही देशांसाठी चांगले होईल, असेही ते म्हणाले.