मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कारण, येत्या गुरुवारपासून म्हणजेच 28 ऑक्टोबर 2021 पासून मध्य आणि पश्चिम रेल्वेवर लोकलच्या 100 टक्के फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. शासनाने निवडलेल्या श्रेणींनाच एसओपीनुसार प्रवास करण्याची परवानगी आहे.
उपनगरीय ट्रेनमधील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन, आता 28 ऑक्टोबर 2021 पासून, मध्य आणि पश्चिम रेल्वे उपनगरीय सेवा प्री-कोविड स्तरावर म्हणजेच मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात 100% चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 22 मार्च 2020 पासून कोविड-19 लॉकडाऊनमुळे रेल्वे सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. नंतर 15 जून 2020 पासून, रेल्वेने राज्य सरकारने निवडलेल्या आणि रेल्वे मंत्रालयाने मंजूर केलेल्या अत्यावश्यक सेवा श्रेणींसाठी उपनगरीय सेवा सुरू केल्या.
उपनगरीय गाड्यांमध्ये प्रवास करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिलेल्या आणि रेल्वे मंत्रालयाने मंजूर केलेल्या प्रवाशांच्या श्रेणी, नंतर ऑगस्ट 2021 मध्ये आणि अलीकडच्या आठवड्यात वाढवण्यात आल्या. सध्या, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे अनुक्रमे मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात 1702 आणि 1304 उपनगरीय सेवा चालवत आहेत, ज्या त्यांच्या एकूण उपनगरीय सेवांच्या 95.70 % आहे.
आता 28 ऑक्टोबर 2021 पासून, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात प्री-कोविड स्तरावर 100% उपनगरीय सेवा म्हणजेच मध्य रेल्वेवर 1774 आणि पश्चिम रेल्वेवर 1367 सेवा चालवण्यात येणार आहेत. फक्त राज्य सरकारने निवडलेल्या श्रेणी आणि त्यांनी जाहीर केलेल्या SOP नुसार प्रवास करण्याची परवानगी आहे.