मान्सूनपूर्व पावसानं राज्यात धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. यवतमाळमध्ये आज चक्क गारा पडल्या. जिल्ह्यात दिवसभर कडक ऊन होतं. मात्र संध्याकाळी वातावरणात अचानक बदल झाला. सोसाट्याच्या वाऱ्यासह, गारपीट आणि धुवाधार पाऊस बरसला.
यावेळेस विजांच्या कडकडाटात मुसळधार अवकाळी पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली. विजांचा कडकडाट सुरू होऊन गारांचा मारा सुरू झाला. अनेक ठिकाणी गारांचा खच जमा झाला. या मान्सूनपूर्व पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्यांना काहीसा दिलासा मिळाला.
संध्याकाळी ढग दाटून वादळी वारे सुटले. त्यात विजांचा कडकडाट सुरू होऊन गारांचा मारा सुरू झाला. गारांसह जोरदार पाऊस सुरू झाल्याने नागरिकांची एकच त्रेधातिरपीट उडाली. नाला भरल्यामुळे रस्त्यावरून पाणी वाहू लागले. तर अनेक ठिकाणी गारांचा खच जमा झाला.
दुसरीकडे खरीप हंगामपूर्व तयारी करणाऱ्या शेतकऱ्यांची देखिल अवकाळी पावसामुळे प्रचंड तारांबळ उडाली आहे. यंदाचा उन्हाळा सर्वांनाच कासावीस करणारा ठरला. उन्हाचा पारा सातत्याने 44 ते 45 अंशावरच स्थिरावला होता.
नागरिक सकाळीच 8 नंतर कडक उन्हामुळे घराबाहेर पडत नव्हते तर शेतकरी वर्ग देखील खरीप हंगामासाठी दुपारी बारा वाजेपर्यंत शेतात घाम गाळत आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला.
दरम्यान कोकण किरनारपट्टी वर जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उद्यापर्यंत मान्सून अरबी समुद्रात पोहचण्याची शक्यता आहे. तर आज मान्सून संपूर्ण श्रीलंका व्यापण्याचा अंदाज आहे. नियोजित वेळेपेक्षा 6 दिवस आधीच मान्सूनचे वारे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे उन्हाला वैतागलेल्या जनतेचं लक्ष हे पावसाकडे लागून राहिलंय.