राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील धरणगाव शहरात गेल्या 25 दिवसापासून पाणी मिळत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. धरणगाव शहरातील नागरिकांना अक्षरशः विहिरीतील व गुरांचे पिण्याचे दूषित पाणी वापरण्याची वेळ आली आहे.
राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव जिल्ह्यातील जळगाव ग्रामीण मतदार संघात असलेल्या धरणगाव शहरात पाणी प्रश्न चांगलाच पेटला आहे. गेल्या 25 दिवसापासून नागरिकांना पाणी मिळत नसल्याने पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. खरंतर अनेक वर्षांपासून धरणगाव शहरात ही परिस्थिती असून पाणीपुरवठा मंत्री आपल्या मतदारसंघातील असताना देखील धरणगाव शहराचा पाणी प्रश्न मात्र सुटला नसल्याने नागरिकांनी आंदोलन करत रोष देखील व्यक्त केला. मात्र तरी देखील प्रशासनाकडून केवळ आश्वासन देऊन वेळ मारून नेली जात आहे.
धरणगाव शहराचा पाणी प्रश्न भीषण असताना यावर प्रतिक्रिया देत गुलाबराव पाटील यांनी नदीला पुर आल्याने पंपात गाळ साचून पंप बंद झाल्याने तांत्रिक पाणीटंचाई झाल्याचे म्हणत आता काय आकाशातून पाणी टाकू का? अशी वादग्रस्त प्रतिक्रिया देऊन पाणी प्रश्न बाबत संताप व्यक्त केला आहे.