श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला, 20 हून अधिक नागरिक जखमी

एकीकडे जगभर रशिया विरुद्ध युक्रेनच्या युद्धाची दहशत असताना भारताच्या सीमेवरही दहशतवाद्यांनी हल्ल्यांचे सत्र सुरूच ठेवले आहे. जम्मू-काश्मीरच्या खोर्‍यात अलिकडच्या काही महिन्यांपासून सुरक्षा दलांना टार्गेट करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यातच रविवारी श्रीनगरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. हरि सिंह हायस्ट्रीटच्या मार्केटमध्ये तैनात असलेल्या सुरक्षा दला च्या तुकडीला दहशतवाद्यांनी टार्गेट केला. या सुरक्षा दलाच्या तुकडीच्या दिशेने दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकला होता. मात्र निशाणा चुकल्यामुळे त्या ग्रेनेडचा दुसर्‍या जागी जाऊन स्फोट झाला. यात एका नागरिकाचा मृत्यू झाला, तर पोलिस कर्मचार्‍यासह 20 हून अधिक नागरिक जखमी झाले.

श्रीनगरमध्ये प्रसिद्ध आणि वर्दळीचा मानला जाणार्‍या अमीरा कदल बाजारात दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. रविवार हा सुट्टीचा दिवस असल्यामुळे या बाजारात प्रचंड गर्दी झाली होती. त्याचदरम्यान दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकला. या ग्रेनेडच्या स्फोटाचा मोठा आवाज परिसरात आल्यानंतर बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची एकच पळापळ झाली. या ग्रेनेड हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला, तर 23 हून अधिक नागरिक जखमी झाले. जखमींमध्ये एका पोलिस कर्मचार्‍याचाही समावेश आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो, अशी भिती व्यक्त केली जात आहे. श्रीनगर पोलिसांनी ही माहिती दिली आहे.

हल्ल्याबाबत एका पोलीस अधिकार्‍याने सांगितले की, रविवारी संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास दहशतवाद्यांनी हरिसिंह हाय स्ट्रीटवर तैनात असलेले पोलीस आणि सुरक्षा दलांवर ग्रेनेडने हल्ला केला. हल्ल्यातील जखमींना श्री महाराजा हरिसिंह रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून हल्लेखोर दहशतवाद्यांना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

या अनुषंगाने परिसरात सर्च ऑपरेशन राबवण्यात येत आहे, असे पोलिस अधिकार्‍याने सांगितले. दरम्यान, या ग्रेनेड हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही. सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आहे. दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांकडून सुरू असलेल्या कारवाईदरम्यान श्रीनगरमध्ये हा हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या काही महिन्यांत जम्मू-काश्मीर पोलीस आणि निमलष्करी दलाने अनेक मोठ्या दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. त्यामुळे दहशतवादी खवळले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.