सानपाडा परिसरातील जॅक अँड जिल रुग्णालयाचे बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रेम पहूजा यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. घरातील गॅलरीच्या अँगलला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. त्यांच्या पत्नी कल्याण येथे राहत असल्याने डॉक्टर सानपाड्यात एकटेच राहत होते. रुग्णालयात दुपारी 1 वाजता रुग्ण आला असताना रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी डॉक्टर प्रेम यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांचा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, प्रेम हे रुग्णालयाच्या इमारतीतच राहायला असल्याने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सोसायटीच्या वॉचमनला घरी पाठवेल. यावेळी डॉक्टरांनी परिचारिकेशी बोलून रुग्ण हाताळला आणि संध्याकाळी ओपीडीला येतो, असे सांगितले.
डॉक्टर संध्याकाळी 7 वाजता ओपीडीला आले नसल्याने रुग्णालयातून त्यांना फोन केल्यावर त्यांचा फोन बंद येत होता. त्यामुळे पुन्हा रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने वॉचमेनसोबत घरी जाऊन त्यांच्या घराचा दरवाजा वाजवला. पण आतून कोणताच प्रतिसाद आला नाही. याबाबत रुग्णालय कर्मचाऱ्यांनी सोसायटीच्या सदस्यांनाही कल्पना दिली. त्यानंतर सोसायटी सदस्यांनी पोलिसांना कळवून दरवाजा तोडला. यावेळी डॉक्टर गॅलरीमधील पत्र्याच्या अँगेलाला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत दिसले.
डॉक्टर प्रेम पहूजा हसतमुख आणि दिलदार व्यक्तिमत्व असलेले नवी मुंबई परिसरात प्रचलित डॉक्टर होते. प्राथमिक माहितीनुसार त्यांनी मानसिक तणावातून आत्महत्या केली असल्याचे सांगण्यात येत आहे. पण घटनास्थळी कोणत्याही प्रकारची सुसाईड नोट सापडलेली नाही. त्यामुळे मृत्यचे गूढ वाढले आहे. सानपाडा पोलिसांनी त्यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पालिका रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.