पोलीस दलातीलच एक अजब किस्सा चर्चेचा विषय ठरतो आहे. मध्य प्रदेशमध्ये एका पोलीस हवालदाराने मिशा ठेवल्या म्हणून त्याला निलंबित करण्यात आलंय. याआधी सूचना देऊनही मिशा कमी न केल्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आलीय. पोलिसांच्या या कारवाईची सध्या सोशल मीडयावर एकच चर्चा होत आहे.
निलंबित पोलीस हवालदाराचे नाव राकेश राणा असे आहे. ते विशेष पोलीस महासंचालकांच्या वाहनाचे चालक होते. राकेश राणा यांनी चांगल्याच स्टाईलीश मिसा ठेवलेल्या आहेत. राकेश कर्तव्यावर असलेल्या पोलीस विभागाने त्यांचे राहणीमान, त्यांची स्टाईल या सर्व गोष्टींची पाहणी केली. पाहणीदरम्यान राकेश यांनी अत्यंत विचित्र प्रकारे मिशा राखल्याचं पोलिसांना समजलं. त्यानंतर पोलीस दलाने त्यांना मिशा कापून त्या व्यवस्थित करण्याचा सल्ला दिला.
मात्र वरिष्ठांकडून सूचना मिळूनदेखील पोलीस हवालदार राकेश राणा यांनी जिद्द सोडली नाही. काहीही झालं तरी मिशा कापणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. त्यानंतर नियमांचा भंग केल्याचा ठपका ठेवत राणा यांच्यावर कारवाई करण्यात आली. राणा यांना निलंबित करण्यात आले. तसेच नियमांची अवहेलना केल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांवर त्याचा परिणाम पडतो, असे निरीक्षण पोलीस प्रशासनाने नोंदवले. राणा यांना शासनाकडून दिला जाणारा जीवन निर्वाह भत्ता मिळणार आहे.
दरम्यान, राकेश राणा यांच्या मिशांची स्टाईल सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरली आहे. सोशल मीडयावर त्यांचा आणि त्यांच्या मिशांचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. तसेच मध्य प्रदेश पोलिसांवर टीका केली जात आहे.