तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार आणि आमदाराची संपत्ती १९८५ टक्क्यांनी वाढली आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (ADR) प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे. ज्योत्स्ना मंडी यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, २०१६ मध्ये त्यांची एकूण संपत्ती १ लाख ९६ हजार ६३३ रुपये इतकी होती. २०२१ मध्ये ही संपत्ती ३९ लाख ४ हजार ५११ ने वाढली असून ४१ लाख १ हजार १४४ वर पोहोचली आहे.
२७ मार्चला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात निवडणूक लढणाऱ्या ३० उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्राचा एकत्रित सर्व्हे करण्यात आला. २०१६ मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर विजय मिळवणारे आणि सध्या भाजपात असलेले संदीप कुमार मुखर्जी यांची संपत्ती २८८.८६ टक्क्यांनी वाढल्याचं सांगण्यात आलं आहे. याशिवाय अनेक उमेदवारांच्या संपत्तीत मोठी वाढ झाल्याचं समोर आलं आहे. पश्चिम बंगाल विधानसभेतील २९४ जागांसाठी आठ टप्प्यात निवडणूक होणार आहे. २९ एप्रिलला शेवटच्या टप्प्यातील मतदान होईल. २ मे रोजी मतमोजणी होणार आहे.