श्रीलंकेतील अभूतपूर्व असे आर्थिक संकट हाताळण्यासाठी अंतरिम सरकार स्थापन करण्याचे आंदोलकांचे आवाहन देशाचे पंतप्रधान महिंदू राजपक्षे यांनी शनिवारी फेटाळून लावले. ‘वेगवेगळी धोरणे असलेले लोक एकमेकांशी नजरही मिळवत नसतील, तर अशा राजकीय संरचना काही उपयोगाच्या नाहीत,’ असे मत त्यांनी नोंदवले.
‘वेगवेगळी धोरणे असलेले लोक एकमेकांशी नजरही मिळवत नसतील, तर अंतरिम सरकारचा उपयोग काय? यासाठी करार व्हायला हवा, जो शक्य नाही. अंतरिम सरकारची आवश्यकता असेल, तर तसे केवळ माझ्या नेतृत्वाखालीच व्हायला हवे,’ असे ‘नेथ एफएम’ या रेडिओ केंद्राशी बोलताना राजपक्षे म्हणाले. विदेशी विनिमयाच्या संकटासाठी सरकारची धोरणेच जबाबदार असल्याचे सांगून, सरकारविरोधी आंदोलक अध्यक्ष गोताबया राजपक्षे व पंतप्रधान राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.
श्रीलंकेतील राजकीय परिस्थिती दिवसेंदिवस अधिक बिकट होत चालली आहे. नेतृत्वाचा अभाव असल्याने या ठिकाणी सरकार स्थापन कसे करावे हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये नागरिकांचे मात्र मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. वाढती महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंची टंचाई अशा परिस्थितीत जीवन कसे जगावे हा एक मोठा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांचा समोर पडलेला आहे.