मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सवर 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. राजस्थानने मुंबईला विजयासाठी 91 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान मुंबईने 2 विकेट्सच्या मोबदल्यात 8.2 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. मुंबईने 70 चेंडू शेष ठेवून हा सामना जिंकला. पलटणने मोठ्या फरकाने सामना जिंकल्याने प्लेऑफमध्ये पोहचण्याच्या आशा या कायम आहेत. तर राजस्थानचा पराभव झाल्याने त्याचं या 14व्या मोसमातील आव्हान संपुष्टात आलंय.
विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या मुंबईची आश्वासक सुरुवात झाली. कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन या सलामी जोडीने 23 धावांची सलामी भागीदारी केली. त्यानंतर रोहित शर्मा 22 धावा करुन बाद झाला. सूर्यकुमार मैदानात आला. ईशानने सूर्यकुमारसह धावफळक धावता ठेवला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 33 धावांची भागीदारी केली. यानंतर सूर्या 13 धावांवर आऊट झाला. त्यामुळे मुंबईचा स्कोअर 2 बाद 56 असा झाला.
सूर्यानंतर हार्दिक मैदानात आला. मात्र तोवर सामना मुंबईच्या बाजूने झुकला होता. एका बाजूला विकेट जात असताना ईशान फटकेबाजी करत होता. मुंबई विजयाच्या उंबरठ्यावर होती. तर ईशानला अर्धशतकासाठी 6 धावांची आवश्यकता होती. यावेळेस ईशानने सिक्स ठोकत मुंबईला विजय मिळवून दिला. सोबतच 25 चेंडूत नाबाद अर्धशतकही पूर्ण केलं.
दरम्यान त्याआधी मुंबईने टॉस जिंकून राजस्थानला बॅटिंगसाठी भाग पाडलं. राजस्थानची आश्वासक सुरुवात झाली. एव्हिन लेव्हीस आणि यशस्वी जयस्वाल या ओपनिंग जोडीने 27 धावांची भागीदारी केली. त्यानंतर नॅथन कूल्टर नाईलने मुंबईला ब्रेक थ्रू मिळवून दिला. त्याने यशस्वीला 12 धावांवर बाद केलं. राजस्थानने यानंतर एव्हिन लेव्हिसच्या रुपात दुसरी विकेट गमावली. त्यामुळे राजस्थानची 2 बाद 41 अशी स्थिती झाली.
यानंतर पुढे राजस्थानच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांसमोर शरणागती पत्कारली. मुंबईच्या गोलंदाजांनी राजस्थानच्या फलंदाजांना तग धरता आला नाही. पलटणने ठराविक अंतराने राजस्थानला धक्के दिले.
राजस्थानने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 90 धावा केल्या. राजस्थानकडून एव्हिन लेवीसने सर्वाधिक 24 धावा केल्या. तर त्यानंतर डेव्हिड मिलरने 15, आणि यशस्वी आणि राहुल तेवतियाने प्रत्येकी 12 धावा केल्या.
मुंबईकडून कुल्टर नाईलने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. जेम्स निशामने 3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर जस्प्रीत बुमराहने 2 विकेट्स घेत या दोघांना चांगली साथ दिली.
राजस्थानला मोठ्या फरकाने पराभूत केल्याने मुंबईचा नेट रनरेटमध्ये फायदा झाला आहे. या साम्न्याआधी मुंबईचा रनरेट हा -0.453 इतका होता. तर या सामन्यानंतर तो -0.048 इतका झाला आहे. मोठ्या फरकाने विजय मिळवल्याने मुंबईच्या प्लेऑफच्या जर तरच्या आशा या कायम आहेत. तर राजस्थानचं आव्हान जवळपास संपल्यात जमा आहे.
दरम्यान मुंबईचा या मोसमातील 14 वा आणि अखेरचा सामना हा 8 ऑक्टोबरला सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध खेळवण्यात येणार आहे.