टोकयो पॅरालिम्पिकमध्ये भारताचा धडाका सुरूच आहे. भारतीय एथलिट प्रवीण कुमारनं शुक्रवारी पुरुषांच्या टी-64 स्पर्धेच्या फायनलमध्ये सिल्व्हर मेडल जिंकले. उंच उडीच्या स्पर्धेत प्रवीणनं 2.07 मीटर उंच उडी मारत मेडल पटकावले. भारताचे या स्पर्धेतील हे 11 वे मेडल आहे.
नोएडामध्ये राहणाऱ्या 18 वर्षांच्या प्रवीणची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याची यापूर्वी त्यानं 2.05 मीटर उंच उडी मारली होती. याचबरोबर प्रवीणनं नवा आशियाई रेकॉर्ड देखील केला. ब्रिटनच्या ब्रूम एडवर्सनं 2.10 मीटर उंच उडी मारत गोल्ड मेडल पटकावले. त्याला प्रवीणनं जोरदार झुंज दिली. पोलंडच्या लेपियाटो मासिएजो यानं 2.04 मीटर उडी मारत ब्रॉन्झ मेडल पटकावले.
भारताची सर्वोत्तम कामगिरी
पॅरालिम्पिक स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी भारतानं टोकयोमध्ये नोंदवली आहे. या स्पर्धेत भारतीय टीमनं आत्तापर्यंत 2 गोल्ड, 6 सिल्व्हर आणि 3 ब्रॉन्झ असे एकूण 11 मेडल पटकावले आहेत. यापूर्वी रिओमध्ये झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतानं 2 गोल्ड आणि 4 सिल्व्हर मेडलची कमाई केली होती.