स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जे विद्यार्थी एमपीएससीची पूर्व परीक्षा पास होतील, मात्र मुख्य परीक्षा पास होऊ शकणार नाहीत, आता अशा विद्यार्थ्यांनाही नोकरीत प्राधान्य देण्याचा सरकारचा विचार सुरू आहे. याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
‘ जे विद्यार्थी एमपीएससी परीक्षेची तयारी करून पुर्व परीक्षा पास होतात पण मुख्य परिक्षा पास होऊ शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांना राज्य सरकारकडून जी हजारो पदे कंत्राटी पद्धतीवर भरली जातात त्यामधे प्राधान्य देण्याचा विचार आहे. यामुळे सरकारचाही पैसाही वाचेल आणि तरुणांना योग्य मोबदला देखील मिळेल. ज्यांनी अशापद्धतीचे नोकर भरती कंत्राट घेतलेले असते तो कामगारांच्या मागण्यांकडे लक्ष देत नाही. त्यांना व्यवस्थित पगार देखील मिळत नाही. जर अशा पद्धतीने भरती झाल्यास अनेक प्रश्न सुटतील. मात्र हा फक्त केवळ एक विचार आहे. याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून घेतला जाईल’ असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार?
जे विद्यार्थी एमपीएससी परीक्षेची तयारी करून पुर्व परीक्षा पास होतात पण मुख्य परिक्षा पास होऊ शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांना राज्य सरकारकडून जी हजारो पदे कंत्राटी पद्धतीवर भरली जातात त्यामधे प्राधान्य देण्याचा विचार असल्याचं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ही योजना अंमलात आल्यास ज्या विद्यार्थ्यांनी एमपीएससीची पूर्व परीक्षा पास केली आहे, अशा विद्यार्थ्यांना देखील नोकरी मिळण्याची शक्यता आहे.