वीज तोडणीची कारवाई तात्पुरत्या
स्वरूपात थांबवण्याचा निर्णय
महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या वीज तोडणीसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या वीज तोडणीची कारवाई तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची घोषणा उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलीय. या निर्णयाचे विरोधकांनी स्वागत केले आहे.राज्यात वीज खंडित करण्यात आलेल्या ग्राहकांकडे 6423 कोटी रुपये थकीत आहेत. कृषीपंप असणाऱ्या ग्राहकांकडे डिसेंबरपर्यंत 44 हजार 920 कोटी रुपये थकबाकी झाली आहे. एकूण 64 हजार कोटी इतकी प्रचंड थकबाकी झाली आहे. थकबाकी भरण्यासाठी विविध उपाय योजना राबविण्यात आल्या आहेत.
हिजाब घालणे ही अत्यावश्यक
धार्मिक प्रथा नाही, खंडपीठाचा निकाल
हिजाब प्रकरणावर आज कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निकाल दिला आहे. हिजाब घालणे ही अत्यावश्यक धार्मिक प्रथा नाही, हिजाब हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही, असे कर्नाटक उच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटले आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबच्या बंदीला आव्हान देणाऱ्या विविध याचिका फेटाळून लावल्या आहेत.
हा निकाल म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा
गैरवापर करणाऱ्यांना चपराक : निकम
“कोर्टाचा निकाल महत्वपूर्ण आहे. भारतीय राज्यघटनेने नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलंय, त्याचा गैरवापर केला जातो. कोणतेही कपडे आपण घालू शकतो, या भावनेला या निकालाने चपराक दिली आहे, असं ज्येष्ठ सरकारी वकील उज्वल निकम म्हणाले. सर्वांनी या निकालाचं स्वागत करायला हवं, कोर्टाचे निर्णय भारतीय लोकशाहीला बळकटी मिळेल,” असंही ते म्हणाले.
उच्च न्यायालयाच्या निकालाशी असहमत
असणं हा माझा अधिकार : ओवेसी
मी हिजाबवर कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाशी असहमत आहे. निर्णयाशी असहमत असणे हा माझा अधिकार आहे आणि मला आशा आहे की याचिकाकर्ते सुप्रीम कोर्टाकडे अपील करतील, अशी प्रतिक्रिया असदुद्दीन ओवेसी यांनी दिली आहे. मी आशा करतो एमआयएम नाही तर, इतर धार्मिक गटांच्या संघटनांही या निर्णयावर अपील करतील, कारण या निर्णयाने धर्म, संस्कृती, भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मूलभूत अधिकार रद्द केले आहेत, असंही ओवेसी म्हणाले.
विद्यार्थ्यांनी टाकला
परीक्षेवर बहिष्कार
कर्नाटक उच्च न्यायालयाने हिजाब प्रकरणावर निकाल दिल्यानंतर अवघ्या काही तासांनंतर, कर्नाटकातील यादगीर येथील सुरापुरा तालुका केंबवी सरकारी पीयू कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला आणि तेथून निघून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रात पूर्वतयारी सुरू होती आणि निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला. परीक्षा दुपारी १ वाजेपर्यंत संपणार होती.
सत्य गोष्टी समोर आल्या
पाहिजेत : पंतप्रधान मोदी
दिल्लीमध्ये आज (१५ मार्च २०२२ रोजी) पार पडलेल्या भाजपाच्या संसदीय समितीच्या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींनी सत्य गोष्टी समोर आल्या पाहिजेत हे सांगताना ‘द कश्मीर फाइल्स’ आणि त्याला होणाऱ्या विरोधाचं उदाहरण दिलं. “तुम्ही सध्या पाहिलं असेल की ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाची चर्चा सुरु आहे. जे लोक नेहमी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे झेंडे घेऊन फिरतात, ती पूर्ण जमात मागील पाच-सहा दिवसांपासून खवळले आहेत,” असा टोला मोदींनी लगावला आहे.
काश्मिरी पंडितांसाठी वेगळ्या
तरतुदी करा : सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळे लोकसभेत बोलताना केंद्र सरकारला म्हणाल्या की, “तुम्हाला काश्मिरी पंडितांबद्दल वाईट वाटत असेल, तर त्यांचा अर्थसंकल्पात समावेश करा, त्यांच्यासाठी वेगळ्या तरतुदी करा. गेल्या ६० वर्षांत त्यांच्यावर किती अन्याय झाला हे सांगणं गरजेचं नाही. तुम्हाला देखील सत्तेत येऊन सात वर्षे झाली आहेत. झालं ते सोडून देत तुम्ही का त्यांना मदत करत नाही. एखादं मूल जर कुपोषित असेल तर त्याची आई त्याला सात वर्षात चांगलं खायला देईल आणि त्यांला निरोगी करेल, कुपोषणातून बाहेर काढेल, माझं मूल कुपोषित आहे, असं सांगत फिरणार नाही,” असं उदाहरण देत सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला सुनावलं.
मुंबईत उष्णतेचा पारा चढला,
तीन दिवस धोक्याचा इशारा
मुंबईत पाऱ्याने जवळपास 40 शी गाठली आहे. अशातच हवामान विभागाने मुंबई, ठाण्यासह कोकणासाठी धोक्याचा इशारा दिला आहे. पुढचे तीन दिवस मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाचे असणार आहेत. कडक ऊन बाहेर असणार आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना सावधान राहा आणि काळजी घ्या. यंदा मार्च महिन्यातच मे महिन्याप्रमाणे कडक उन्हाचे चटके बसू लागले आहेत.
अजान सुरू होताच अजित पवार
यांनी थांबवले भाषण
अजित पवार यांनी आपल्या भाषणामध्ये विकासकामांची माहिती देताना कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. सायंकाळी सात सव्वा सातच्या सुमारास हे भाषण सुरु असतानाच शेजारीच असणाऱ्या मशीदीमधून अजानचा सुरु झाल्याचा आवाज ऐकू आला. हा आवाज येताच अजित पवारांनी आपलं भाषण थांबवलं. अजित पवार अजान संपेपर्यंत काही मिनिटं भाषण न करताच उभे राहिले. अजान संपल्यानंतर अजित पवारांनी भाषण पुढे सुरु करत विकासकामांचा पाढा वाचून दाखवला. पवारांच्या भाषणाआधी त्यांना घालण्यात आलेल्या मोठ्या आकाराच्या हारावरुनही त्यांनी कार्यकर्त्यांना फटकारलं.
मॅगीच्या पाकिटाची किंमत
दोन रुपयांनी वाढली
मार्च महिन्यात अनेक वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. ज्याचा सरळ परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला दूध, कर्मशिअल सिलेंडर महागलं आहे. त्यातच आता मॅगीची किंमत ही वाढली आहे. अनेकांसाठी अडचणीच्या वेळी झटपट भूक भागवणारी मॕगी आता 14 रुपयांना मिळणार आहे. Maggi चं उत्पादन करणारी कंपनी Nestle ने 12 रुपयांना मिळणाऱ्या मॅगीच्या पाकिटाची किंमत आता 14 रुपये केली आहे. त्यामुळे ही बातमी अनेकांसाठी बॅडन्यूज ठरली आहे.
SD social media
9850 60 35 90