कबड्डी स्पर्धेवेळी गोळीबार, आंतरराष्ट्रीय खेळाडूची हत्या

पंजाब विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर जालंधरमध्ये देशाला हादरवून टाकणारी एक घटना घडलीय. जालंधरमध्ये एका कबड्डी खेळाडूची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीय. संध्याकाळी जालंधरच्या मालिया गावात एका कबड्डी स्पर्धेवेळी आंतरराष्ट्रीय पातळीवरील कबड्डी खेळाडू संदीप नंगल अंबियावर अज्ञातांनी हल्ला केला. गोळीबारानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली. स्पर्धेसाठी उपस्थित प्रेक्षक भीतीनं पळू लागले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संदीपच्या डोक्यावर आणि छातीवर जवळपास 20 राऊड फायर करण्यात आले. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

संदीपने एक दशकापेक्षा अधिक काळ कबड्डी स्पर्धेत नाव गाजवलं होतं. त्याने पंजाबसह कॅनडा, अमेरिका, ब्रिटनमध्येही आपल्या प्रतिभेचं प्रदर्शन केलं आहे. आपल्या खेळाच्या जोरावर संदीपचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलं होतं. त्याची अॅथलेटिक प्रतिभा आणि कबड्डीतील नैपुण्यामुळे त्याला डायमंड स्पर्धक म्हणूनही ओळखलं जात होतं. मृत्यूपूर्वी संदीप कबड्डी फेडरेशनचं व्यवस्थापन पाहत होता.

अंबिया गावात राहणाऱ्या संदीपवर मालिया गावात कबड्डी कप स्पर्धा सुरु असतानाच अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार करत हत्या केली. संदीपच्या डोक्यावर आणि छातीवर जवळपास 20 राऊंड फायरिंग करण्यात आल्याची माहिती मिळतेय. घटनास्थळावर उपस्थित लोकांच्या मते संदीपवर हल्ला करणारे एकूण 12 जण होते. या हल्ल्याचा एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये हल्लेखोर संदीपवर गोळ्या झाडत असल्याचं पाहायला मिळतंय. गोळीबाराच्या आवाजानं स्टेडियमवरही मोठा गोंधळ पाहायला मिळतोय.

कबड्डीत खेळाडूच्या हत्येमागचं कारण काय?
व्यावसायिक कबड्डी स्पर्धेत संदीप स्टॉपर पोझिशनमध्ये खेळायचा. त्याने कबड्डीत मोठं नाव कमावलं होतं. राज्यस्तरीय सामने खेळून त्याने आपल्या कबड्डी कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्याचे चाहते त्याला ग्लॅडिएटर अर्थात योद्धा म्हणून ओळखायचे. त्याने एक दशकापेक्षा अधिक काळ कबड्डीच्या जगावर राज्य केलं. पंजाबसह कॅनडा, यूएसए, यूकेमध्येही त्यानं कबड्डी स्पर्धांमध्ये नाव कमावलं होतं.

दरम्यान, हल्लेखोर नेमके कोण आहेत? याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. तसंच त्याच्या हत्येमागील कारणही अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, आताच निवडणुका पार पडल्या आहेत. नवं सरकार अजून स्थापन होणं बाकी असतानाच एका मोठ्या कबड्डी खेळाडूवर झालेला हल्ला आम आदमी सरकारसमोरील मोठं आव्हान असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.