पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली. दुसऱ्या टप्प्यात ३०, तर आसाममध्ये ३९ जागांसाठी मतदान होत आहे. तृणमूलच्या एका कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली, तर तृणमूलकडून आपल्या कार्यकर्त्यांना धमकावलं जात असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.
सकाळी सात वाजता मतदानाला सुरूवात झाल्यानंतर मतदारांनी अधिकार बजावण्यासाठी मतदान केंद्राबाहेर रांगा लावलेल्या होत्या. सकाळी पहिल्या दोन तासांत बंगालमध्ये १३.१४ टक्के मतदान झालं. तर आसाममध्ये १०.५१ टक्के मतदान झालं आहे. आसाममध्ये मतदान शांततेत सुरू आहे. तर दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये मतदानाला सुरूवात झाल्यानंतरही राजकीय संघर्ष सुरूच आहे. मतदान केंद्रावर करोनासंदर्भातील सर्व खबरदारी घेण्यात आलेली असून, सोशल डिस्टन्सिगसह तापमान तपासणी करून मतदारांना केंद्रात सोडलं जात आहे. नौपारातील बूथ क्रमांक २२ आणि आंचल १ येथे आमच्या पोलिंग एजंटला तृणमूल काँग्रेसच्या १५० कार्यकर्त्यांनी घेराव घातला. त्यांना मतदान केंद्रात जाऊ दिलं नाही. बुरूनियातही तृणमूलचे चिन्ह दाखवून धमकावण्यात आलं,” असा आरोप भाजपाच्या उमेदवार भारती घोष यांनी केला.
दुसऱ्या टप्प्यातील मतदान होण्याच्या एक दिवस आधीच म्हणजे बुधवारी एका तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याची अज्ञातांनी हत्या केल्याचं समोर आलं आहे. धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आल्याची घटना पश्चिम मदिनापूर जिल्ह्यातील दादपूर गावात घडली आहे. या प्रकरणी आठ लोकांना अटक करण्यात आली असल्याचं मदिनापूरच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितलं.