उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर ठेवण्यात आलेल्या स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणात एनआयएच्या तपासातून महत्वाची बाब समोर आली आहे. अँटिलियाजवळ स्फोटकं असललेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आली होती. या गाडीचे मालक मनसुख हिरेन होते. हिरेन यांनी गाडी चोरीला गेल्याचं म्हटलं होतं. पण गाडी चोरीला गेली नाही, तर हिरेन यांनीच गाडीची चावी वाझे यांना दिली होती, असं तपासातून समोर आलं आहे.
“हिरेन यांचा शवविच्छेदन अहवाल अद्याप आलेला नाही. मात्र, प्राथमिक दर्शनी असं दिसत की, हिरेन यांचा मृत्यू गळा दाबून नव्हे तर श्वास कोंडल्यानं झालेला आहे. त्यांच्या मृतदेहावर अशा कोणत्याही खुणा आढळून आलेल्या नाहीत. शवविच्छेदन अहवालातून हे निश्चित होईल. स्फोटकांनी भरलेली गाडी आढळण्यापूर्वी हिरेन यांनी स्कॉर्पिओ गाडीची चावी वाझे यांना दिली होती. त्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन कार चोरीला गेल्याची तक्रार हिरेन यांनी केली होती.
“कॉल डेटा रेकॉर्ड, हत्येत सहभागी असलेल्या लोकांचं लोकशन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या पुराव्यातून वाझे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या या प्रकरणात सहभाग असल्याचंच दिसून येतं. मिठी नदीत मिळालेल्या ईलेक्ट्रॉनिक साधनांमधूनही माहिती मिळवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत,” असं सूत्रांनी सांगितलं.