राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड कोल्हापूरच्या दौऱ्यावर होते. पण अचानक आव्हाड यांचा ताफा आल्यामुळे वाहतूक कोंडीतून वाट करून देताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. यावेळी एका पोलीस हवालदाराने एका वाहनधारकाला चांगलाच धपाटा दिला.
जितेंद्र आव्हाड कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. कोल्हापूरच्या भाऊंसिंगजी रोडवर जितेंद्र आव्हाड यांचा ताफ पोहोचला असता त्यावेळी ही घटना घडली. आव्हाडांचा ताफा जात असताना अचानक एका चौकात वाहतूक कोंडी झाली होती. आव्हाड यांचा ताफा थांबल्यामुळे पोलिसांनी गाड्यांना बाजूला हटवण्यासाठी एकच धावपळ उडाली.
आव्हाडांच्या ताफ्याला रस्ता मोकळा करून देताना एका पोलिसाने चक्क वाहनधरकाला चापट मारली. जितेंद्र आव्हाड हे अंबाबाई दर्शनासाठी आले होते. यावेळी ते वाहतूक कोंडीमध्ये अडकले होते. त्यामुळे त्यांना रस्ता मोकळा करून देताना पोलिसांना चांगलाच घाम फुटला. त्यामुळे संतप्त झलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने थेट एका जीप चालकाच्या हातावर चापट मारली. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची कोल्हापुरात आज समोरासमोर भेट झाली. यावेळी दोघांनी हात हातात घेत ते उंचावत आम्ही एकच आहोत हा संदेश दिला. एका बाजूला शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रवादी शिवसेनेला निधी देत नसल्याचा आरोप होत असताना दुसऱ्या बाजूला शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने कोल्हापुर दौऱ्यावर आलेल्या संजय राऊत आणि अनपेक्षितपणे भेटलेल्या जितेंद्र आव्हाड यांची भेट चर्चेचा विषय ठरली आहे.