तब्बल 36 दिवसांनंतर राणा दाम्पत्य शनिवारी अमरावतीमध्ये दाखल झालं. यावेळी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. ठिकठिकाणी स्वागत झाल्यानंतर राणा दाम्पत्यावर दुग्धाभिषेक करण्यात आला. नवनीत राणा यांनी त्याचा एक व्हिडिओ आपल्या ट्टिटर अकाऊंटवर शेअर केलाय.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा सध्या देशात चर्चेत आहेत. त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं होतं. मातोश्री समोर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर मुंबईत शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. नवनीत राणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना काही दिवस तुरुंगात ही राहावं लागलं होतं.
नवनीत राणा यांनी शिवसेनेच्या काही नेत्यांची दिल्लीत तक्रार दिली असल्याचं देखील समोर आलं आहे. त्यामुळे हे नेते कोण याबाबत लोकांमध्ये चर्चा आहे.
दिल्लीतून अमरावतीत परतल्यानंतर राणा दाम्पत्य आणि भीम आर्मी आमने-सामने आले. नवनीत राणा आणि रवी राणा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानं भीम आर्मी आक्रमक झाले होते.
नवनीत राणा आणि रवी राणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध आक्रमक भूमिका घेत आहेत. शनिवारी देखील बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती.