आज दि.१२ डिसेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

‘मविआ’ला शाईफेकीचं समर्थन भोवणार! आक्रमक भाजपकडून विरोधकांना थेट इशारा

शनिवारी भाजप नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली. ते पिंपरी- चिंचवडमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी कार्यकर्त्याच्या घरातून बाहेर निघताना त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. या प्रकरणात तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र यावरून आता वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळत आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेकीनंतर भाजप आक्रमक झालं आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ आज पुण्यात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात भाजप आमदार, शहराध्यक्ष आणि भाजपाचे माजी महापौर सहभागी झाले .

तीन दिवसांमध्येच केजरीवालांना धक्का, ‘आप’चा आमदार भाजपच्या वाटेवर, तीन जण संपर्कात!

गुजरात विधानसभेचे निकाल लागून फक्त तीनच दिवस झाले आहेत. या निवडणुकीत भाजपला रेकॉर्डब्रेक यश मिळालं. अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष गुजरातमध्ये भाजपला तगडं आव्हान उभं करू शकतो, असं काही राजकीय जाणकार सांगत होते, पण त्यांचा हा अंदाज फोल ठरला. गुजरातमध्ये भाजपला 156, काँग्रेसला 17 आणि आपला 5 जागांवर यश मिळालं. या पैकी आता आपचा आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे.

विसवादर मतदारसंघातून भूपत भायानी आपच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले, पण आता ते भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. येत्या काही काळात भूपत भायानी भाजपला समर्थन देऊन त्यांच्या जुन्या पक्षात प्रवेश करू शकतात. भाजप उमेदवार हर्षद रिबडिया यांचा पराभव करून भूपत भायानी यांनी विजय मिळवला होता.

हिवाळ्यात नक्की खा काळे गाजर; वेट लॉससोबत या गंभीर आजाराचा धोका करतात कमी

काळ्या गाजरांची चव केशरी गाजरांपेक्षा चांगली असते. याशिवाय त्याचा गोडवाही चांगला आहे. काळे गाजर खाल्ल्यानंतर बराच वेळ तोंडात त्याची छान चव राहते.काळ्या गाजरामध्ये फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-सी, मॅंगनीज, व्हिटॅमिन-बी सारखे पोषक घटक असतात, जे चांगल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.काळ्या गाजरामध्ये अँथोसायनिन मुबलक प्रमाणात आढळते. हृदयाच्या आरोग्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. काळे गाजर रक्तातील अशुद्धता स्वच्छ करून रक्ताभिसरण सुधारते. गाजराचा रस शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवतो.काळ्या गाजरामध्ये भरपूर फायबर असतात, ज्यामुळे पाचन तंत्राला चालना मिळते. काळे गाजर बद्धकोष्ठता, गॅस, पोट फुगणे, छातीत जळजळ, अस्वस्थता, अतिसार यांसारखे आजार बरे करते.

सेमीफायनलमध्ये मेस्सीच्या खेळण्यावर येऊ शकते बंदी, फिफा कारवाईच्या तयारीत

जगातल्या दिग्गज फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या लियोनेल मेस्सीने त्याच्या कारकिर्दीत अनेक यशाची शिखरे गाठली. पण गेल्या दोन दशकांच्या फूटबॉल कारकिर्दीत त्याला अर्जेंटिनासाठी फिफा वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. यंदा त्याला वर्ल्ड कप विजेतेपदाचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी आहे. अर्जेंटिनाने नेदरलँडला हरवून सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. मात्र मेस्सीशिवाय अर्जेंटिनासाठी सेमीफायनलमध्ये आव्हान पेलणं सोपं नाही. मेस्सी सेमीफायनलमध्ये खेळणार की नाही याबाबत अद्याप काही निश्चित नाही.

अर्जेटिंनाने दोन गोलची आघाडी अखेरच्या काही मिनिटात गमावल्यावंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये नेदरलँडला 4-3 ने हरवलं. आता सेमीफायनलमध्ये अर्जेंटिनाचा सामना क्रोएशियासोबत होणार आहे. क्रोएशियाने क्वार्टर फायनलमध्ये ब्राझीलला हरवून मोठी उलथापालथ केली. आता सेमीफायनलसारख्या महत्त्वाच्या सामन्यात मेस्सीवर बंदीची टांगती तलवार असणार आहे.

एअर इंडियासाठी टाटा ग्रुपचा मोठा निर्णय, 150 नवीन विमानांची करणार खरेदी

भारतातील विमान सेवा म्हटलं, की एअर इंडियाचं नाव घेतलं जातं. ही सरकारी कंपनी टाटा समूहाने खरेदी करून अद्याप एक वर्षही पूर्ण झालं नाही. टाटा समूहात येताच या कंपनीने भरारी घेण्यास सुरुवात केली आहे. या कंपनीनं नुकतीच नव्या विमानांची खरेदी करण्याची तयारी सुरू केली आहे.

एअर इंडिया टाटा समूहात येताच या कंपनीचे दिवस बदलले. एअर इंडिया आता दिवसेंदिवस चांगली सेवा देऊन ग्राहकांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे. त्याच बरोबर स्वतःचं नाव मजबूत करण्याचं काम करत आहे. आता या कंपनीने नवीन विमानांची खरेदी करण्याची तयारी सुरू केली आहे. एअर इंडिया बोइंग कंपनीकडून 737 मॅक्स जेट प्रकारच्या 150 विमानांची खरेदी करण्याच्या ऑर्डरवर स्वाक्षरी करण्याच्या तयारीत आहे. ‘ईटी’च्या रिपोर्टनुसार, टाटा समूहाच्या मालकीच्या या भारतीय कंपनीने 150 विमानांची ऑर्डर दिली आहे.

हाफकीनकडून औषध खरेदीस होणाऱ्या दिरंगाईचा आरोग्य विभागाच्या रुग्णालयांना फटका!

‘आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना’ या म्हणीचा अनुभव सध्या आरोग्य विभागाला घ्यावा लागत असून याचा फटका आरोग्य विभागात उपचारासाठी येणाऱ्या हजारो गोरगरीब रुग्णांना बसत आहे. हाफकीन जीव औषध महामंडळाकडून वेळेवर औषध खरेदी केली जात नाही आणि सरकार आरोग्य विभागाला त्यांच्या स्तरावर औषध खरेदीस मान्यता देत नसल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून ते जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना याचा फटका बसत आहे. कर्करोगाच्या आजारापासून विविध आजारांवरील उपचारासाठी लागणाऱ्या औषधांची खरेदी गेल्या दोन वर्षांपासून रखडल्यामुळे किमान आरोग्य आयुक्तालयाला त्यांच्या स्तरावर औषध खरेदीस परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आरोग्य आयुक्तालयाने सरकारकडे केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

घराणेशाहीच्या राजकारणापासून काँग्रेसची फारकत; हिमाचल प्रदेशात नवा पायंडा

काँग्रेसमध्ये नेत्यांची मुले, पत्नी, जावई, भाऊ आदींना नेहमीच प्राधान्य दिले जाते. यातूनच अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला. सध्याच्या परिस्थितीत घराणेशाहीचा पुरस्कार करणे काँग्रेसला शक्य दिसत नाही. यामुळेच हिमाचल प्रदेशात मुख्यमंत्रीपदाची निवड करताना काँग्रेसने माजी मुख्यमंत्री विरभद्र सिंह यांच्या पत्नीऐवजी सुखविंदरसिंह सुखू यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केले.

पाच वर्षांपासून संधी न मिळाल्याने नायरने व्यक्त केली खंत; आता ट्विट होत आहे व्हायरल

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी जयदेव उनाडकटची भारतीय संघात निवड झाल्यावर सर्वांनाच आश्चर्य वाटले. मोहम्मद शमीच्या दुखापतीनंतर उनाडकटचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याच्या निवडीमुळे अनेक खेळाडूंना पुनरागमन करण्याची प्रेरणा मिळाली आहे. भारतासाठी त्रिशतक झळकावणारा करुण नायर त्यापैकीच एक आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणाऱ्या या फलंदाजाला आता कर्नाटक संघाच्या रणजी संघातूनही वगळण्यात आले आहे. त्यानंतर त्याचे एक ट्विट सध्या व्हायरल होत आहे.

‘दृश्यम २’ चित्रपटाने २०० कोटींची कमाई केल्यानंतर अजय देवगण भावूक

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला ‘दृश्यम २’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. अवघ्या महिनाभरातच चित्रपटाने देशांतर्गत २०३ कोटींचा गल्ला जमवला आहे. ‘दृश्यम २’ची यशस्वी घौडदोड पाहिल्यानंतर अजय देवगण भावूक झाला आहे.

‘दृश्यम २’ चित्रपटाने २०० कोटींची कमाई केल्यानंतर अजय देवगणने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने प्रेक्षकांचे आभार मानले आहे. अजय देवगणने त्याचा फोटो पोस्ट केला आहे. “’दृश्यम २’ चित्रपटाने २०० कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे आणि अजूनही करत आहे. चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे आभार. आमच्या चित्रपटाला एवढं प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद” असं म्हणत अजय देवगणने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.