देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांच्या अटकेबाबत CM शिंदेंचा गौप्यस्फोट; म्हणाले, “हे सर्व उद्योग…”

काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना, महाविकास आघाडीचं सरकार असताना मला अटक करण्याचा प्रयत्न सुरू होता, असा आरोप केला होता. त्यानंतर विविध राजकीय चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याबाबत मोठा दावा केला आहे. गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांच्या अटकेच्या चर्चा सुरू होत्या, त्याचा मी साक्षीदार आहे, असं ते म्हणाले. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांच्या आरोपांनाही प्रत्युत्तर दिलं.

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

“आमच्यावर विरोधकांना धमकवल्याचा आरोप केला जातो. मात्र, ठाकरे सरकारने रवी राणा-नवनीत राणा यांना अटक केली होती. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जेवणाच्या ताटावरून उचलून नेलं होतं. एवढी तत्परता ठाकरे सरकारने दाखवली. कंगणा रानौतचं घर पाडण्यात आलं. केतकी चितळेला अटक करण्यात आली. गिरीश महाजन यांच्यावर मोक्का लावण्याची तयारी होती. त्याची कॅसेटही बाहेर आली. गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस या दोघांना अटक करण्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यावेळी मी तिथे होतो. गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस या दोघांना आता घाला, या वक्तव्याचा मी साक्षीदार आहे. त्यावेळी मी काय म्हणालो होतो, हे मी योग्य वेळी सांगेन. हे सर्व उद्योग कोण करत होतं, हे सर्व मला माहिती आहे”, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

विरोधकांच्या टीकेलाही प्रत्युत्तर

पुढे बोलताना त्यांनी विरोधकांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं. आम्ही चहापानाला गेलो असतो तर महाराष्ट्र द्रोह झाला असता, अशी टीका विरोधकांनी शिंदे सरकारवर केली होती. यासंदर्भात बोलताना, मुख्यमंत्री म्हणाले, “मला त्यांना सांगायचा आहे की, दाऊदची बहिण हसिना पारकरला ज्यांनी चेक दिला. त्यांच्या मंत्र्यांनी राष्ट्रद्रोह केला, तरीही त्यांचा राजीनामा अजित पवार यांनी घेतला नाही. बरं झालं अजित पवारांसोबत चहा पिण्याची आमची वेळ टळली. कारण महाराष्ट्र द्रोह मोठा की देशद्रोह मोठा? सत्तेच्या बाहेर पडल्यामुळे अजित पवार वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांनी मानसिकता आम्ही समजू शकतो. मासा पाण्याविना तडफडतो, तशी सत्तेच्या बाहेर गेल्यानंतर विरोधकांची अवस्था झाली आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.