नंदुरबार जिल्हा हा राज्यातील मिरचीचे आगार म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतले जातं. मात्र यावर्षी पीक विम्यातून मिरची पिकाला वगळण्यात आले आहे. नैसर्गिक आपत्तीने मिरची पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना कुठली नुकसान भरपाई मिळणार नसल्याने मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात जवळपास दहा हजार हेक्टर क्षेत्रावर मिरचीची लागवड केली जात असते. यावर्षीही पाऊस कमी असतानाही मिरचीच्या क्षेत्रात थोडीफार घट आली आहे. यावर्षी सात ते आठ हजार एकर क्षेत्रावर आतापर्यंत मिरचीची लागवड झाली असून, सरकारने पीक विम्यातून मिरची पिकाला वगळले असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने दिलासा द्यावा आणि मिरचीचा पीक विम्यात समावेश करावा, त्यासाठी भारतीय जनता पार्टी केंद्र सरकारकडे पाठ पुरावा करेल, मात्र राज्य सरकारनेही शेतकऱ्यांचा पाठीशी उभे राहावे, असं आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केलं.
मिरची पिकावर येणाऱ्या विविध रोगांनी मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत असतात. त्यात दरवर्षी येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत असतो. मात्र मिरचीचा पीक विमा योजनेतून वगळल्याने मिरची उत्पादक शेतकऱ्यांची गत दुष्काळात तेरावा महिना अशी झाली आहे.