देशावरून अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नाही. दररोज सापडणाऱ्या कोरोनाबाधित रूग्णांमुळे केंद्र सरकारने चिंता व्यक्त केली आहे. अशातच आता सण तोंडावर असताना केंद्र सरकारडून नियमांचं पालन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्षी देखील गणपती, दसरा आणि दिवाळी देखील कोरोनाच्या नियमांसोबतच साजरी करावी लागणार आहे.
“देशात कोरोनाची दुसरी लाट अजूनही ओसरली नाही. कोरोना रुग्णसंख्येत नेहमीच सणासुदीनंतर वाढ झाल्याचं दिसून येतं. त्यामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातील सण जबाबदारीने साजरे करणं गरजेचं आहे,” असं आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितलं. तसंच लसीकरण झाल्यानंतर मास्क आणि कोरोना नियमावलीचं पालन करणं आवश्यक आहे, असंही त्यांनी सांगितलंय.
केरळमधील कोरोना स्थितीवरही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे. केरळसह महाराष्ट्रात रात्रीच्या संचारबंदीची सूचनाही केंद्राने केली आहे. सरकारच्या म्हणण्याप्रमाणे, “देशातील 41 जिल्ह्यांमध्ये साप्ताहिक संसर्गाचे प्रमाण 10 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. कोरोनाच्या सणासुदींच्या दिवसांमध्ये योग्य व्यवस्थापन करणं आणि नियमांचं पालन करणं गरजेचं आहे.”
दरम्यान केरळ हे एकमेव राज्य आहे जिथे कोविड -19 च्या सक्रिय रुग्णांची संख्या एक लाखाहून अधिक आहे. तर चार राज्यांमध्ये ते 10 हजार ते एक लाख आणि 31 राज्यांमध्ये कोविड -19वर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे, अशी माहितीही सरकारकडून देण्यात आली आहे
दरम्यान आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव म्हणाले की, “कोरोनाची लस ही सुधारणा आणण्यासाठी आहे आणि रोखण्यासाठी नाही. त्यामुळे लसीकरणानंतरही मास्कचा वापर करणं अत्यंत महत्वाचं आहे.”