गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्तानाट्यावर अखेर पडदा पडला आहे. भाजपसोबत सत्ता स्थापन करायची की, पदावरुन पायउतार व्हायचं हे दोनचं पर्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे होते. शेवटी काल उद्धव ठाकरे यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. यानंतर आता भाजपकडून सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.
1 जुलैला होणार नवीन सरकार स्थापन
उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नव सरकारचा 1 जुलैला शपथविधी होण्याची शक्यता आहे. सुत्रांनी ही माहिती दिली आहे. उद्या भाजप सत्तास्थापनेचा दावा करणार आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही नेते 1 जुलैला शपथ घेण्याची शक्यता आहे. उद्या हंगामी अध्यक्षांची निवड होणार असल्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार का?
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत पक्षाचे निम्म्याहून अधिक आमदार सोबत आहेत. त्यामुळे भाजपसोबत सत्ता स्थापन करताना शिंदे गटाला काय मिळणार? याकडे आता राज्याचं लक्ष लागलं आहे. यापूर्वी माध्यमात आलेल्या बातम्यांनुसार, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदी असतील. शिंदे यांच्यासोबत प्रहार संघटनेचे दोन आमदारांसह काही अपक्ष आमदारही आहेत. त्यामुळे सत्तेचा वाटा कसा होणार? याबद्दल तर्तवितर्क लढवले जात आहेत.