परभणी जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. लग्नाच्या जेवणातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या विषबाधेमुळे 100 पेक्षा जास्त नागिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. परभणी शहरातील दर्गा रोड परिसरात संबंधित घटना घडली आहे. विषबाधा झालेल्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. रुग्णालय प्रशासन याप्रकरणी सतर्क झालं असून रुग्णांवर उपचार सुरु करण्यात आले आहेत.
दर्गा रोड परिसरामध्ये आज एक विवाह समारंभ होता. या विवाह समारंभामध्ये जेवणाच्या नंतर काही वेळाने शंभर ते दीडशे लोकांना उलट्या आणि मळमळ सत्र सुरू झालं. तर काही जणांना चक्कर येऊ लागले. त्यामुळे त्यांना परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.
संबंधित विवाह सोहळा हा आज संध्याकाळच्या सुमारास पार पाडला. लग्न लागल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम झाला. पण जेवणानंतर अवघ्या एक ते दीड तासात लग्नाला आलेल्या काही नातेवाईकांना मळमळ आणि उलटीचा त्रास होऊ लागला. काही जणांना चक्कर येऊ लागले. त्यामुळे लग्नातील सर्वजण घाबरले. परिसरातील डॉक्टरांना बोलवण्यात आलं. पण सर्वच जणांना त्रास होऊ लागल्याने तातडीने जिल्हा रुग्णालयात सगळ्यांना उपचारासाठी पाठवण्यात आलं. जेवणातून विषबाधा झाल्याने हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही विषबाधा नेमकी कशामुळे झाली? कुणी मुद्दाम तसं कृत्य करण्याचा प्रयत्न केला का? किंवा शिळा असलेल्या भाजीपाल्याचा स्वयंपाक केला गेला होता का? नेमकं कोणत्या पदार्थातून विषबाधा झाली? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. संबंधित घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची पोलिसांनी दखल घेतली आहे का याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. पोलीस या प्रकरणात तपास करतील तर कदाचित विषबाधेचं कारण समोर येऊ शकतं.