राज्यात मागच्या काही दिवसांपासून उन्हाच्या झळा बसत असल्याचे जाणवत आहे. दरम्यान हवामान विभागाने मुंबईसह राज्यातील बहुतांश जिल्ह्यात एप्रिल आणि मे महिन्यात उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
दरम्यान काही ठिकाणी उन्हाच्या झळा तर काही ठिकाणी पावसाचीही शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढच्या दोन दिवसांत म्हणजे 07 एप्रिलपर्यंत विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 7 एप्रिलपर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. 4 एप्रिल रोजी विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली तर 5 एप्रिल रोजी गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.
आजपासून राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. 04) पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानासह उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.एप्रिल महिन्यापासून राज्यात उन्हाच्या झळा सुरू होतात. यामुळे काही अंशी तापमान कमी जास्त होत असते. दरम्यान मागच्या 24 तासांत सोलापूर, अकोला आणि चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी चंद्रपूर 38.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
वर्धा आणि ब्रह्मपूरी येथे 37 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. उर्वरीत राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान 34 ते 36 अंशांच्या दरम्यान होते. तर किमान तापमान कमी-अधिक होत असून, पारा 11 ते 24 अंशांच्या दरम्यान होता.
विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक दक्षिण तामिळनाडूपर्यंत समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा व खंडीत वाऱ्यांची स्थिती आहे. पश्चिम राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत असून, विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे.