सूर्याचं वादळी शतक पाण्यात, तिसऱ्या T20 मध्ये इंग्लंडचा रोमांचक विजय

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 मध्ये टीम इंडियाचा 17 रनने पराभव झाला आहे. इंग्लंडने दिलेल्या 216 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना सूर्यकुमार यादवने वादळी शतक झळकावलं, पण तरीही टीम इंडियाच्या पदरी निराशा आली. भारताला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 198 रन करता आले. सूर्यकुमारने 55 बॉलमध्ये 212.73 च्या स्ट्राईक रेटने 117 रनची खेळी केली. सूर्याच्या या इनिंगमध्ये 14 फोर आणि 6 सिक्सचा समावेश होता. टीम इंडियाच्या खेळाडूचा हा दुसरा सर्वाधिक स्कोअर आहे. रोहितच्या नावावर आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 118 रनचा विक्रम आहे. तसंच चौथ्या किंवा त्याखालच्या क्रमांकावर खेळताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा हा सर्वाधिक स्कोअर ठरला.

सूर्यकुमार वगळता दुसऱ्या कोणत्याही भारतीय खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. श्रेयस अय्यरने 23 बॉलमध्ये 28 रन केले. एवढ्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरूवात खराब झाली. 31 रनवरच भारताच्या 3 विकेट गेल्या होत्या, तरीही सूर्याने इंग्लंडच्या बॉलिंगवर आक्रमण सुरूच ठेवलं. इंग्लंडकडून रीस टॉपलीला सर्वाधिक 3 विकेट मिळाल्या, याशिवाय डेव्हिड विली आणि क्रिस जॉर्डन यांनी प्रत्येकी 2-2 विकेट मिळवल्या. ग्लिसन आणि मोईन अली यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं.

इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलर याने या सामन्यात टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आणि 20 ओव्हरमध्ये 215/7 पर्यंत मजल मारली. डेव्हिड मलानने 77 आणि लियाम लिव्हिंगस्टोनने नाबाद 42 रनची खेळी केली. भारताकडून रवी बिष्णोई आणि हर्षल पटेल यांना 2-2 तर आवेश खान, उमरान मलिक यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं.

3 टी-20 मॅचच्या या सीरिजमध्ये भारताने पहिल्या दोन मॅच आधीच जिंकत सीरिज खिशात टाकली होती, त्यामुळे या सामन्यात चार प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली. हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहल यांच्याऐवजी श्रेयस अय्यर, आवेश खान, उमरान मलिक आणि रवी बिष्णोई यांना संधी देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.