मोदींमुळे लहान उद्योग, शेतकरी उद्ध्वस्त; नांदेडमधील सभेत राहुल यांची टीका

सहा वर्षांपूर्वी रात्री ८ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी करून आणि त्यानंतर चुकीच्या पद्धतीने जीएसटी लागू करून रोजगार निर्माण करणारे लहान उद्योग, शेतकरी यांनाच उद्ध्वस्त केले, अशा शब्दांत काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी केंद्रातील भाजप सरकारवर हल्ला चढविला. नोटबंदी ही काळय़ा पैशांविरोधातील लढाई आहे, असे मोदींनी सांगितले होते, परंतु ते खोटे होते, तो काळय़ा पैशांवरचा हल्ला नव्हता तर या देशातील कोटय़वधी हातांना काम देणारे लहान व्यापारी, व्यवसाय आणि उद्योगांवर आघात होता, असे राहुल म्हणाले.

‘भारत जोडो’ यात्रेचा आजचा महाराष्ट्रातील चौथा दिवस होता. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी नांदेडमध्ये जाहीर सभा घेण्यात आली. त्यावेळी राहुल यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघांवर टीका केला. मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे सामान्य माणसाला, शेतकऱ्यांना, मजुरांना, लहान व्यापारी, उद्योगांना ते परिणाम भोगावे लागत आहेत, त्यावर राहुल यांनी शाब्दिक आसूड ओढले. स्वंतत्र भारतात २८ टक्के इतका कर कधीही लावला गेला नव्हता. जीएसटीच्या माध्यमातून मोदी सरकारने हा कर लादल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांवर कधीही कराचे ओझे लादले गेले नव्हते, परंतु मोदींनी खतावर, शेतीच्या अवजारांवरही जीएसटी लावल्याचे राहुल म्हणाले. 

मोदी देशातील सर्व धन फक्त दोन-तीन उद्योगपतींच्या घशात घालत आहेत, असा आरोप राहुल यांनी केला. नोटबंदी आणि जीएसटीमुळे जो उद्योग किमान ३० लोकांना रोजगार देत होता, तेथे आज कशाबशा ५० लोकांना नोकऱ्या मिळत आहेत. म्हणजे २५० जणांचा रोजगार मोदींना हिरावून घेतला, त्यांना बेरोजगार केले. ‘‘नोटबंदी करून काळा पैसा संपवला नाही तर मला चौकात फाशी द्या, असे मोदी म्हणाले होते. पण गेल्या सहा वर्षांत काळा पैसा संपला का असा,’’ सवाल राहुल यांनी केला.

सुशिक्षत युवक-युवतींना रोजगार मिळू द्यायचा नाही, मग त्यांच्यात भय निर्माण होते. त्या भयातून द्वेषाचे वातावरण तयार करायचे ही भाजप आणि आरएसएसचे धोरण आहे, त्याविरोधातच भारत जोडो यात्रा निघाली आहे, असे त्यांनी सांगितले.

खरगे यांची मराठीतून टीका

मल्लिकार्जुन खरगे यांनी मराठीतून भाषण केले. आधी पोटोबा मग विठोबा, पण मोदी तुमच्या पोटावर मारत आहेत. मोदींना रोज उठून आम्हाला शिव्या घातल्याशिवाय चैन पडत नाही. तुम्हाला शिव्या देणारे हवेत की सेवा करणारे अशा अस्खलित मराठीत त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

इंदिरा गांधींनी आम्हा भटक्यांना नाव, गाव दिलं..

‘आम्ही भटकी जमात, आज इथं तर उद्या तिथं..! इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी आम्हाला घरे दिली, पाच-पाच एकर जमिनी दिल्या. आता त्यांचा नातू येणार हाय म्हणून त्याला आशीर्वाद द्यायला आम्ही रस्त्यावर उभा हाय..!’ सुमारे पासष्ट वर्षे वयाच्या सुशीला बाप्पा मांडवकर भावनिक होऊन सांगत होत्या. इंदिरा गांधी यांच्या तिसऱ्या पिढीशीसुद्धा त्यांचे ऋणानुबंध आणि त्यांना समाजात ओळख निर्माण करून दिल्याची जाणीव त्यांच्या भावनांमधून व्यक्त होत होती. सकाळी ८ च्या सुमारास काकांडी गावाजवळ समाजातील १५ महिला मुलांसह रस्त्याच्या कडेला पदयात्रेची वाट पाहत दोन तास उभ्या होत्या. त्यांच्या मागे पडसर मैदानात त्यांच्या राहुटय़ा दिसत होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.